संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा असून या भाषेमुळे उच्चार व वाणीत शुद्धता येते. इतर भाषा शिकताना त्याचा उपयोग होतो. त्यामुळेच संस्कृत भाषा ही इतर भाषांची जननी आहे, असे प्रतिपादन सरिता देशमुख यांनी येथील मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिरात आयोजित संस्कृत भाषा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी केले.
या वेळी देशमुख यांनी रामायण, महाभारतकालीन स्त्रियांचा आदर्श मांडत स्त्री शक्तीचे महत्त्व विशद केले. द्रौपदी, कैकयी, सत्यभामा यांच्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही त्यांच्यासारखेच तेजस्वी व्हावे, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सविता खरे होत्या. व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका आशा गवारे, पर्यवेक्षक गीता कुलकर्णी, सुनंदा जगताप, शिक्षक प्रतिनिधी अतुल करंजे आदी उपस्थित होते. समृद्ध अहिरेने नवरस, भाग्यश्री पाटीलने कथाकथन सादर केले. स्पर्धेत आठवी ते दहावी दरम्यानच्या ८७ मुलींनी भाग घेतला. समृद्धी अहिरे व निलोफर मुलानी यांनी सूत्रसंचालन केले. आभार गायत्री विटेकरने मानले.