पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी सांताक्रूझ-चेंबूर जोड मार्गाचे विघ्न अद्याप संपलेले नाही. टिळकनगर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ असलेल्या पुलाच्या भागामध्ये येणाऱ्या इमारतीमधील रहिवाशांना देण्यात आलेल्या पर्यायी जागेवरील इमारतीचे बांधकाम सोमवारी कोसळलेच; पण या बांधकामाच्या हादऱ्यांनी आजूबाजूच्या इमारतींनाही तडे गेल्यामुळे नवीन टिळकनगरमधील रहिवासी धास्तावले आहेत.
सांताक्रूझ-चेंबूर जोड मार्गामध्ये येणाऱ्या नवीन टिळकनगरमधील म्हाडाच्या चार इमारतीमधील रहिवाशांना पर्यायी जागा देण्याचे एमएमआरडीने मान्य केले होते. या रहिवाशांना टिळकनगरमधील मैदानाच्या जागेवर इमारत बांधून देण्यासाठी म्हाडाच्या आराखडय़ात बदल करण्यात आले आणि दोन वर्षांंपासून तेथे इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या इमारतीचा पाया सुमारे २९ फुटांपेक्षा जास्त खोल खणण्यात येत आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या या कामाच्या हादऱ्यांनी आजूबाजूच्या इमारतींच्या भिंतींना तडे गेल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे त्याच्या बाजूच्या म्हाडाच्या २५ वर्षे जुन्या इमारतीच्या भिंतीला मोठे तडे गेल्याचे सोमवारी लक्षात आल्यावर रहिवाशांनी इमारत रिकामी केली. १० इमारतींना या बांधकामाचे हादरे बसून धोका निर्माण झाल्याचे तेथील रहिवासी क्षीरसागर यांनी सांगितले.
एमएमआरडीएच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आता वाहनतळ प्रत्येक इमारतीला सक्तीचा असल्याने आणि १२ मजली इमारतीपेक्षा जास्त उंच इमारत बांधण्याबाबत निर्बंध असल्याने तळमजल्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यामुळे पाया खोल जात असल्याने बाजूला उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या बांधकामास काही प्रमाणात तडे गेले आहेत.
 एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी सर्व इमारतींची पाहणी केली असून केवळ एकाच १६१ क्रमांकाच्या इमारतीस थोडे तडे गेले असून त्यामुळे धोका निर्माण झालेला नाही.
सोमवारी रात्रीच हे काम पूर्ण करण्यात येईल, असा निर्वाळा दिला. यामुळे रहिवाशांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे सूत्रांनी सांगितले.