जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विश्रामगड येथे दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेच्या कार्यकर्त्यांद्वारे गडावर श्रमदान करून पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या.
शिवकालीन किल्ले इंग्रजांनी भारतातून जाता जाता तोफगोळ्यांचा भडिमार करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे किल्ले खंबीरपणे आजही तग धरून आहेत. शासनाचे या किल्ल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने आज अनेक किल्ल्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळेच या किल्ल्यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेऊन जिल्ह्य़ातील काही इतिहासप्रेमी युवकांनी एकत्र येऊन दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानची स्थापना केली. शिवाजी महाराजांचे काही काळ वास्तव्य असलेल्या सिन्नर-घोटी रस्त्यावरील टाकेदजवळील विश्रामगडावर ही स्थापना करण्यात आली. विश्रामगडावर श्रमदानही करण्यात आले. गडावरील आठ ते दहा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या.
प्रतिष्ठानची कोणतीच कार्यकारिणी नसून किल्ल्यांवर प्रेम करणारी कोणतीही व्यक्ती या मोहिमेत सहभागी होऊ शकते. विश्रामगडावर जाण्यासाठी सिन्नर-ठाणगाव-वैतागवाडी-पट्टेवाडी हा मार्ग आहे. समुद्रसपाटीपासून ४५६२ फूट उंचीवर हा किल्ला आहे. गडाच्या पायथ्याशी पट्टेवाडी गाव असल्याने तो ‘पट्टा गड’ म्हणूनही ओळखला जातो. किल्ल्यावर गुहा आणि पाण्याच्या टाक्या मोठय़ा प्रमाणात आहेत. गडाच्या पहिल्या टप्प्यात पट्टाई देवीचे मंदीर आहे. मंदिराजवळ पाण्याची खोदीव टाकीआहे. किल्ल्याचे उत्तरद्वार आजही टिकून आहे. त्याला ‘दिल्ली दरवाजा’ म्हणतात.
तटबंदी मोठय़ा प्रमाणात ढासळली आहे. माथ्यावर वाडय़ांचे अवशेष दिसतात. या ठिकाणी पाण्याच्या असंख्य टाक्या, गुहा आणि भुयारे आहेत. शिवरायांनी या गडावर संपत्ती दडविल्याची चर्चा असल्याने
आमिषामुळे नाहक खोदकाम होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे गडाची हानी झालेली दिसून येते. हे प्रकार रोखण्यासाठी आता वन विभागाचे चार शिपाई देखरेख ठेवत असतात.
शिवाजी महाराज आणि सेनापती प्रतापराव गुजर यांनी मोगलांच्या ताब्यातील प्रदेशात शिरून धनाढय़ शहरांमधून धनदौलत जमा केली होती. सततच्या युद्धांमुळे राजे थकले होते. बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. त्यांनी राजांना आडवाटेने पट्टे किल्ल्यावर विश्रांतीसाठी आणले. राजे महिनाभर या किल्ल्यावर होते. त्यामुळे या किल्ल्याला ‘विश्रामगड’ म्हटले जाते. ‘जेव्हा डोंगर बोलू लागतात’ या पुस्तकात पांडुरंग कचेश्वर आंधळे-पाटील या नाशिकच्या लेखकाने या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास सखोलपणे मांडलेला आहे. किल्ल्यावर शेकडो
प्रकारची वृक्षराजी आहे. वन विभागाकडून वृक्षारोपणही करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या या मोहिमेत प्रा. आनंद बोरा, विजयकुमार घोटे, पप्पू जगताप आदींनी सहभाग घेतला.