असुविधा आणि अस्वच्छतेमुळे पालिकेची आरोग्य यंत्रणाच रुग्णशय्येवर असणाऱ्या डोंबिवलीत सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आता तेथील मैत्री चॅरिटेबल ट्रस्टने धर्मादाय दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ऑगस्ट महिन्यात तो कार्यान्वित होत आहे.
दैनंदिन शुश्रूषेची गरज असणारे वृद्ध आणि काही अनाथांना आश्रय देणाऱ्या ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’च्या कार्याचा परिचय गेल्या गणेशोत्सवात लोकसत्ता ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून देण्यात आला होता. ‘लोकसत्ता’ वाचकांनी संस्थेच्या कार्याचे महत्त्व जाणून भरभरून मदत केली. त्याचबरोबर मुंबईतील एका कुटुंबाने डोंबिवलीलगतच्या सागाव येथील त्यांची पाच गुंठे जागा संस्थेला दिली. तिथे येत्या दोन वर्षांत इमारत बांधून सध्याच्या भाडय़ाच्या जागेतून संस्था स्वत:च्या वास्तूत स्थलांतरीत होऊन आणखी काही वृद्धांची तिथे सोय होईल. मात्र त्याचबरोबर अमेरिकेतील ह्य़ुस्टनस्थित महेश देसाई यांनी दिलेल्या देणगीतून डोंबिवली पूर्व विभागात पाथर्ली नाका येथे ‘मैत्री..’तर्फे धर्मादाय दवाखाना सुरू करण्यात येत आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेत येथे रक्त तपासणी, एक्स-रे, दंतचिकित्सा, हृदय तपासणी व उपचार या आरोग्य सेवा उपलब्ध असतील, अशी माहिती ट्रस्टच्या मालिनी केरकर यांनी दिली.
वृद्धाश्रमाप्रमाणेच विशेष म्हणजे डोंबिवलीतील डॉ. सुनील बागवे, डॉ. मिहीर देशपांडे, डॉ. केदार रांजणगांवकर आणि डॉ. श्रद्धा कोळी हे तज्ज्ञ डॉक्टर्स या रुग्णालयात मानद स्वरूपात नियमित वेळेत सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. केवळ वृद्ध रुग्णांनाच नव्हे तर सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना येथे माफक दरात आरोग्य सुविधा मिळणार आहे. गरजूंना राजाजी पथ येथील राधा माधव रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करून घेतले जाईल.
मैत्री..च्या उपक्रमांविषयी लेख प्रसिद्ध झाल्यानंतर शासन स्तरावरही संस्थेला जागा मिळवून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र अद्याप त्यातून यश मिळू शकलेले नाही. संस्थेत सध्या ७० ते ९० वयोगटातील १५ वृद्ध, सहा अनाथ महिला आश्रयास असून २० जण प्रतीक्षा यादीवर आहेत. मात्र जागेची अडचण असल्याने यापेक्षा अधिक जणांना सध्या सामावून घेता येत नाही. मात्र सागाव येथील प्रस्तावित इमारतीत अधिक वृद्धांची सोय होईल, असेही केरकर यांनी सांगितले.