शिक्षणापासून वंचित असलेल्या तळगाळागातील मुलांसह अंध, अपंग, व्यंग यासह इतर व्याधीग्रस्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने सर्व शिक्षा अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. एकटय़ा नाशिक शहरात अभियानाच्या माध्यमातून खासगी, महापालिका शाळांसह आश्रमशाळांमध्ये एकुण २,०२९ विद्यार्थी दाखल झाले असून त्यांच्यासाठी खास १३ ‘मोबाईल’ म्हणजे फिरत्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका शिक्षण मंडळ संबंधितांना विविध सेवा, सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असतांना केवळ वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही होत नसल्याने २७५ विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप आवश्यक साहित्य पोहचले नसल्याचे पुढे आले आहे.
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणाऱ्या भारतीय राज्य घटनेच्या ८६ व्या कलमानुसार प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्याचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी प्रकल्प विविध राज्यात राबविला. या अंतर्गत १०१ दशलक्ष वसाहतीमधील १९२ दशलक्ष बालके शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.
अभियानामुळे शारिरीक व्यंग असलेल्या ६ ते १४ वयोगटातील बालकाला सर्व सामान्य मुलाप्रमाणे हक्काचे शिक्षण मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. नाशिक शहराचा विचार करता २०२९ विद्यार्थी अभियानात सहभागी झाले आहेत. त्यात दृष्टीदोष असलेले १३९, अल्पदृष्टी ४४२, कर्णदोष १८४, वाचा दोष २७४, अस्थिव्यंग ३२३, मतीमंद २८८, अध्ययन अक्षम २६८, ‘सेरेबल पाल्सी’ ४३, स्वमग्न ३६ आणि बहुविकलांग ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरातील खासगी, पालिका शाळा तसेच आश्रमशाळेच्या माध्यमातून ही मुले शिक्षणाशी जोडली गेली आहेत. इतर मुलांप्रमाणे त्यांना शिक्षण घेता येत आहे.
त्यासाठी त्यांना आवश्यक व्हील चेअर, कुबडय़ा, ब्रेलकीट, कॅलीपर, ट्रायसिकल, चष्मे, कानाचे यंत्र आदी शैक्षणिक साहित्य पुरविले जात आहे. या शिवाय आठवडय़ातून दोन दिवस त्यांच्या घरी शिकविण्यासाठी १३ मोबाईल अर्थात फिरत्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठवडाभरात विद्यार्थ्यांना शिकवलेल्या संकल्पना, पाठ ,गणितीय समीकरणे, सिध्दांत याबाबत काही अडचणी असल्यास शिक्षकांकडून त्यांना खास मार्गदर्शन करण्यात येते. विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांची संख्या हे प्रमाण व्यस्त असले तरी प्रत्येक मुलाकडे वैयक्तीक लक्ष देण्याचे काम या माध्यमातून होत आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीला असे विद्यार्थी शोधण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येते. या शिबिरातून निवडलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न होत असल्याचे शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले. या मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असून शाळा गळतीचे प्रमाण नियंत्रणात आले आहे. बहुविकलांग विद्यार्थी आपल्या व्याधीमुळे निराश होऊन शिक्षण सोडुन देतात. अद्याप काही विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य पोहचले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधींची अनास्था
सहा महिन्यांपूर्वी जबलपूर येथील एका संस्थेने नाशिक शहरातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. ही संस्था विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य पुरविण्याचे काम करते. या संदर्भात आतापर्यंत दोन वेळा पत्रव्यवहार झाला आहे. मात्र संस्थेकडुन साहित्य न आल्यामुळे २७५ विद्यार्थी त्यापासून वंचित राहिले आहेत. दुसरीकडे या संदर्भात राजकीय स्तरावर उदासिनता दिसुन येते. एकही नगरसेवक वा लोकप्रतिनिधी आपला निधी अशा विद्यार्थ्यांसाठी वापरत नाही हे वास्तव आहे.