कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याच्या कारणावरून संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी निफाड बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले. नैसर्गिक संकटाने शेतीचे आधीच नुकसान झाले असताना व्यापारी कमी भावाने माल खरेदी करून शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचा आरोप करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी सरासरी प्रति क्विंटलला दीड हजार रुपये असणारा भाव गुरुवारी ११०० रुपयांवर आला. दोन दिवसात ४०० रुपयांची घसरण झाल्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला.
मागील आठवडय़ात सलग पाच दिवस झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. कांद्याचाही त्यात समावेश आहे. संकटांची मालिका सुरू असताना कांद्याचे भावही दिवसागणीक घसरत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या कांद्याची आवक सर्व बाजार समित्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आधी काढून ठेवलेला कांदा सध्या बाजारात येत आहे. निफाड बाजार समितीत सकाळी नेहमीप्रमाणे कांदा घेऊन शेतकरी पोहोचले. लिलावाला सुरुवात झाल्यावर ११०० रुपये प्रति क्विंटलला भाव मिळत असल्याचे लक्षात आले. वास्तविक, तीन दिवसांपूर्वी हा भाव १५०० रुपये होता. दोन दिवसात प्रत्येकी २०० रुपयांनी ते घसरले. या भावात उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी लिलाव बंद पाडले. कमी भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.
दोन तास संबंधितांनी लिलाव रोखून धरल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. बाजार समिती संचालकांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यांच्या यशस्वी मध्यस्तीनंतर हे लिलाव पूर्ववत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.