श्वास घ्यायलाही जागा नसलेल्या उपनगरीय रेल्वे गाडय़ा म्हणजे मुंबईकरांचे दुसरे घरच असते. त्यामुळे मंगळागौरीपासून ते नवरात्रीपर्यंत, भोंडल्यापासून ते केळवणापर्यंत अनेक सण, उत्सव आणि समारंभ या उपनगरीय गाडय़ांमध्ये साजरे करण्याचा उत्साह प्रवाशांमध्ये असतो. मात्र आता या उत्साहाने भलतेच रूप घेतले आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी जिथे प्रवाशांना एका पायावरही उभे राहायला जागा नसते, तिथे थेट सत्यनारायणाची पूजा थाटण्यापर्यंत प्रवाशांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नुकतीच विरारहून सुटणाऱ्या एका लोकल गाडीत ही सत्यनारायणाची पूजा सफळ-संपूर्ण पार पडली.
सकाळी साडेसातच्या सुमारास विरारहून सुटणाऱ्या गाडीतील गर्दीच्या कथा पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना वेगळ्या सांगायलाच नकोत. बदलापूर किंवा आसनगावहून याच वेळी सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डोंबिवलीकरांनाही ही व्यथा समजू शकते. मात्र याच गाडीत सोमवारी चक्क श्रावणी सोमवारचे निमित्त साधून सत्यनारायणाची पूजा पार पडली. हा सत्यनारायण गाडीत थाटण्याचा संकल्प विरार येथे राहणाऱ्या अमर संघवी यांनी दोन वर्षांपूर्वी सोडला होता. तेव्हापासून दर वर्षी श्रावणात ही पूजा केली जाते. पूजा मांडणे सोपे जावे, म्हणून ती मालडब्यात मांडली जाते.
विरार ते चर्चगेट या दीड तासांच्या प्रवासात मांडामांड करून पूजा संपन्न होणे शक्य नसल्याने संघवी यांनी ही विरार गाडी नायगाव येथून पकडली. विरार येईपर्यंत सत्यनारायणाच्या पूजेसाठी आवश्यक ती चौरंगाची मांडणी, ताम्हण, सुपाऱ्या, विडय़ाची पाने वगैरे मांडली. त्यानंतर विरार येथे गाडी पोहोचल्यावर नालासोपाऱ्याच्या नरेंद्र व वैशाली कवळे या दाम्पत्याला पूजेसाठी बसवण्यात आले, तर संतोष पारगावकर यांनी ही पूजा सांगितली.
विरारला सुरू झालेली ही पूजा अंधेरी स्थानक येईपर्यंत संपली. त्यानंतर साग्रसंगीत आरतीही करण्यात आली. आरतीनंतर प्रसाद म्हणून वाटण्यासाठी संघवी यांनी सव्वा किलो शिरा आणि पंचामृतही बनवून आणले होते. हा प्रसाद संपूर्ण डब्यात वाटण्यात आला. उपनगरीय रेल्वे प्रवासात दर दिवशी तास-दोन तास एकमेकांबरोबर घालवताना आमचे एक कुटुंब बनते. त्यामुळे आम्ही असे सण-उत्सव साजरे करत असतो, असे संघवी सांगतात. उपनगरीय रेल्वेगाडय़ांवरील मुंबईकरांचे हे प्रेम पाहता येत्या काळात रेल्वे डब्यात दीड दिवसांचा गणपती, ख्रिसमसच्या काळात येशूजन्माचा देखावा, मोहरमचे ताबूत अशा गोष्टीही दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.