मराठी साहित्याचा अनमोल खजिना हिंदी भाषिकांसाठी वेदकुमार वेदालंकार यांनी उपलब्ध केला. सत्यशोधक विचार सांगणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वाङ्मय त्यांनी हिंदीत अनुवादित केले. महाराष्ट्राचे समाजमन प्रबोधनाकडे नेणारे विद्रोही संत तुकाराममहाराज यांची गाथादेखील त्यांनी हिंदीत भाषांतरीत केली. एक-दोन नव्हे, तब्बल ३० पेक्षा अधिक मराठी भाषेतील साहित्यकृती त्यांनी केलेल्या अनुवादामुळे राष्ट्रस्तरावर पोहोचल्या आहेत.
सन १९३२ मध्ये लातूर येथे जन्म झालेल्या वेदालंकार यांचे पूर्ण नाव वेदकु मार रघुत्तमदास डुमणे. सन १९५४ मध्ये हरिद्वार येथील कांगडी गुरुकुलाने त्यांना वेदालंकार ही पदवी बहाल केली. हिंदूीचे पदव्युत्तर शिक्षण आग्रा विद्यापीठ, तर संस्कृतमधून एम. ए. हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून पूर्ण केले. ३६ वर्षे विविध महाविद्यालयांमधून प्राध्यापक ते प्राचार्य या पदावर त्यांनी काम केले.
‘छावा’ ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी त्यांनी सर्वप्रथम हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करून दिली. दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठाने ती प्रकाशित केली. आजवर त्याच्या हिंदी भाषेत सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. रा. रं. बोराडे यांच्या ‘पाचोळा’ कादंबरीचे ‘तिनका’ या नावाने केलेले भाषांतर राष्ट्रस्तरावर पोहोचले आहे. रणजित देसाई यांची शिवचरित्रावर आधारित असलेली ‘श्रीमानयोगी’ ही कादंबरीदेखील १९९८ साली त्यांनी हिंदीमध्ये आणली. राज्य शासनाच्या भाषा समितीने महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण साहित्य संपदा हिंदीत भाषांतरीत करण्यासाठी राज्यातील १० तज्ज्ञांकडे १९८८ साली पत्रव्यवहार केला. त्यातील एकानेही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ही जबाबदारी वेदालंकार यांनी पार पाडली. फुले यांचे समग्र वाङ्मय गुलामी, किसान का कोडा, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीयरत्न आणि इतर रचना असे चार खंडात राज्य शासनाने प्रकाशित केले. त्याचबरोबर ज्योत्स्ना देवधर यांची ‘रमाबाई’, डॉ. एस. के. भोसले यांचे ‘क्रांतीचे अग्रदूत : राजर्षि शाहू महाराज’, जिम कार्बेट यांचे ‘माय इंडिया’, मराठी संत गोरा कुंभार, नरहरी सोनार, चोखा मेळा, सोयराबाई, बंका, कर्ममेळा, निर्मला, कान्होपात्रा या ९ संत कवींच्या एकूण ६०० अभंगांचा देखील त्यांनी हिंदीमध्ये पद्यानुवाद केला.
या साहित्यसेवेची दखल घेत राज्य शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीतर्फे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांना गजानन माधव मुक्तिबोध हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. फुले यांचा साहित्याचे भाषांतर उत्कृष्टरीत्या पार पाडल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही त्यांचा विशेष सत्कार केला. या बरोबरच राज्य आणि राष्ट्र पातळीवरील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आता पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी लेखांचे, अण्णा भाऊ साठे यांच्या २० कथा आणि फकिरा, वारणेचा वाघ आणि वारणेच्या खोऱ्यात या तीन कादंबऱ्या, तसेच संगीत सौभद्र, संगीत शारदा आणि कटय़ार काळजात घुसली. या संगीत नाटकांचे हिंदीत भाषांतर त्यांनी पूर्ण केले आहे. दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठ संस्थेकडून हे साहित्य आता हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध होणार आहे. आपल्या भारूड आणि अभंगाने महाराष्ट्राला वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या संत एकनाथांचे साहित्य भाषांतरित करण्यासाठी त्यांनी हाती घेतले आहे.