‘फाइंडिंग नेमो’ या अॅनिमेशनपटातील क्लॉन फिश, फुटबॉल विश्वचषकादरम्यान प्रसिद्ध झालेला ऑक्टोपस, मत्स्यप्रेमींमध्ये अत्यंत आदराने संबोधला जाणारा आरवाना अशा अनेक दुर्मिळ माशांचे दर्शन घेण्याची संधी मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे.
  गोडय़ा तसेच खाऱ्या पाण्यातील विविध माशांच्या प्रजातींचे दुर्लभ दर्शन घडवणारे ‘अॅक्वा लाइफ’ हे प्रदर्शन ११ एप्रिल ते १६ एप्रिलदरम्यान विले पार्ले येथील साठय़े महाविद्यालयात भरणार आहे.
या प्रदर्शनात १०० हून अधिक प्रजातींचे मासे पाहायला मिळणार आहेत. त्याशिवाय या प्रदर्शनात           २५ मत्स्यटाक्या असतील. या            टाक्यांच्या माध्यमातून पाण्यातील वनस्पती, झुडपे आणि माशांबद्दल माहितीही देण्यात येईल. ‘अॅक्वा लाइफ’च्या माध्यमातून मुंबईकरांना पहिल्यांदाच पाण्याखाली काढलेली १५० छायाचित्रे पाहण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रदर्शनातील ७० टक्के माशांच्या प्रजाती समुद्रातील असतील. आतापर्यंत झालेल्या प्रदर्शनांत गोडय़ा पाण्यातील माशांच्या प्रजातींचा सहभाग जास्त होता.