ब्लाईंड वेल्फेअर असोसिएशन आणि जैन सोशल ग्रुप मिडटाऊन यांच्या वतीने येथील कालिका मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात १०६ अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात ७०० रूपयांचा धनादेश आणि पांढऱ्या काठीचे वाटप करण्यात आले. ८५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील, सचिव सुभाष तळाजिया, उपजिल्हाधिकारी देवदत्त केकाण, ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्य़ातून विद्यार्ती उपस्थित होते. प्रास्तविक भारती लासूरकर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष विकास शेजवळ यांनी संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. २००३ पासून संस्थेने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे सुरू केले. या शिष्यवृत्तीचे वाटप अखंडपणे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अण्णा पाटील, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल शाह, राजीव ठक्कर यांनी संस्थेला भूखंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. देवदत्त केकाण यांनीही मार्गदर्शन केले. रामदास जगताप यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. संस्थेचे उपाध्यक्ष शंकर साळवे यांनी आभार मानले.