नववीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीच्या मनाविरुद्ध तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न उल्हासनगरमधील एका मुलाबरोबर लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या या अल्पवयीन मुलीने गुरुवारी लग्न मंडपात फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  
मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांना तिच्या पोटातील फिनेल बाहेर काढण्यात यश आले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीचा तिच्या मनाविरुद्ध जाऊन विवाह लावण्याचा प्रयत्न केला म्हणून कुटुंबीयांविरुद्ध कारवाई करण्याचा विचार सुरू असल्याचे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर जाधव यांनी सांगितले.
घाटकोपर येथे राहणाऱ्या दोन बहिणींचा उल्हासनगरमधील दोन भावंडांबरोबर उल्हासनगरमधील हिरा सभागृहात शुक्रवारी विवाह होता. मोठय़ा बहिणीचे लग्न पार पडल्यानंतर धाकटय़ा मुलीचे लग्न याच मंडपात होते. धाकटी मुलगी मनाविरुद्ध लग्न होत असल्याने नाराज होती. वेशभूषा करण्याचे निमित्त करून पहिल्या माळ्यावरील स्नानगृहात जाऊन तिने फिनेल प्राशन केले. ही बाब कोणाच्याही निदर्शनास आली नाही. लग्न मंडपात ती येताच बेशुद्ध होऊन कोसळली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेने लग्न मंडपात काही वेळ गडबड उडाली.