शिक्षकाच्या बेजबाबदारपणाच्या निषेधार्थ शेकेईवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला मंगळवारी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. संबंधित बेजबाबदार शिक्षकावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली असून, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे.
शहराचा एक भाग असणाऱ्या शेकेईवाडी येथे जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी शाळा आहे. या शाळेत एक शिक्षक व एक शिक्षिका कार्यरत आहेत. शाळेतील शिक्षिका सध्या रजेवर असून येथे पर्यायी शिक्षिकेची नेमणूक केलेली आहे. या शाळेतील शिक्षक शाळेच्या बाबतीत बेफिकीरपणे वागतात. वर्ग वाऱ्यावर सोडून निघून जातात, असा ग्रामस्थांचा आरोप असून त्यासंदर्भात त्यांना यापूर्वीही ताकीद देण्यात आलेली आहे. तसेच बऱ्याच वेळा हे शिक्षक अध्यापनाऐवजी गप्पा मारत बसतात असेही पालकांचे म्हणणे आहे.
मंगळवारी शाळेतील दोन्ही शिक्षक मुलांना वाऱ्यावर सोडून बराच वेळ गायब असल्याचे पालकांच्या लक्षात आले. ही शाळा कोल्हार-घोटी राज्य मार्गालगतच असल्याने विद्यार्थी बऱ्याच वेळा रस्त्यावर येतात, त्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. शिक्षक गायब असल्याचे लक्षात येताच गावातील महिला व ग्रामस्थ शाळेच्या आवारात जमा झाले व शिक्षकांच्या बेफिकीर वर्तनाच्या निषेधार्थ त्यांनी शाळेला टाळे ठोकले. संबंधित बेजबाबदार शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदनही दिले आहे. जया गायकवाड, मनीषा गायकवाड, चंद्रकला गायकवाड, छबूबाई ताजणे, गणेश ताजणे, उमेश बाळसराफ आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.