ठाणे शहरातील २९ टक्के वाहन चालक पीयूसी तपासणी वेळेवर करत नाहीत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सायकल चालविण्याबाबत  पुरेशी जागृती नाही आणि सार्वजनिक वाहनापेक्षा खाजगी वाहतुकीकडे नागरिकांचा मोठा कल आहे. त्यामुळे शहरातील प्रदुषणांचे प्रमाण वाढत जात असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाय योजनांची जंत्री ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी मांडली. २२ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या निमित्ताने राज्यातून सादर झालेल्या ५३ प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांची निवड राष्ट्रीय परिषदेसाठी झाली असून त्यापैकी पाच प्रकल्प हे ठाणे जिल्ह्य़ातील शाळांचे आहेत. जिज्ञासा ट्रस्टच्या वतीने या पाच प्रकल्पांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली २१ वर्षे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. २२ वी राष्ट्रीय परिषद २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान बंगळुर येथे होणार आहे. ‘समजून घेऊया हवा आणि हवामान’ हा या परिषदेचा विषय असून ठाण्यातील निवड झालेल्या पाच शाळांचे प्रकल्प स्थानिक हवामानातील प्रदुषणाची पुरेपुर माहिती देणारे आहेत. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग आणि सर्वेक्षणांची मदत घेऊन हे प्रकल्प साकारले आहेत. त्यामध्ये डॉ. बेडेकर विद्या मंदिर शाळेच्या मराठी विभागाच्या शाळेने ‘मानवी कृतींचा हवामानावर होणारा परिणाम’ यावर आधारीत प्रकल्प सादर केला आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालय, पीयूसी सेंटर, वाहतुक पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधून या विद्यार्थ्यांनी शहरातील हवामानाच्या ढासळत्या परिस्थितीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे संस्थेच्या बेडेकर विद्यालय आणि महाविद्यालयात वाहन विरहीत, वृक्षारोपण आणि सायकल दिन साजरे करून शहरातील प्रदुषण काही अंश कमी करण्यासाठी प्रयत्न केला.
निवड झालेले अन्य प्रकल्प..
सरस्वती हायस्कूल राबोडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण आणि तापमान वाढीचा झाडांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करून त्यामुळे वृक्षांची वाढ खुंटत असल्याचा निष्कर्ष मांडला. श्रीरंग विद्यालय शाळाने हवामानातील बदलाचा
गोडय़ा व खाऱ्यापाण्याच्या परिसंस्थेवर होणारा परिणाम प्रकल्पाद्वारे सादर केला. भगवती शाळेच्या वतीने सादर केलेल्या प्रकल्पामध्ये दैनंदिन वाहतूक पर्यायांच्या आधारे कार्बन ठशांचा अभ्यास करणारा प्रकल्प सादर केला तर ऐरोली येथील युरो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हल्ली इमारतींच्या बांधकामात वाढत असलेल्या काचेमुळे हवामानावर कोणते परिणाम होतात, याचा शोध घेतला.