कल्याण परिसरात असलेल्या तीस ते चाळीस शाळा दुपारी साडेबारा वाजल्यानंतर सुटतात. या कालावधीत शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने शाळेच्या बस या वाहतूक कोंडीत अडकून विद्यार्थ्यांची दररोज वाहतूक कोंडीतच ‘शाळा’ भरत आहे. या सततच्या वाहतूक कोंडीमुळे पालक, शिक्षक त्रस्त आहेत.
कल्याण शहरातून सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद करावी म्हणून पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासनाने वेळोवेळी ठाणे पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा केला आहे. शहरातील अनेक नागरिकांनी दिवसा शहरातील अवजड वाहतूक बंद करण्यासाठीच्या तक्रारी वाहतूक विभागाकडे केल्या आहेत. पण वाहतूक पोलीस हे सर्व आदेश धाब्यावर बसवून चिरीमिरीसाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश देत असल्याच्या तक्रारी आहेत. ज्या शिवाजी चौक, सहजानंद चौक, बाजारपेठ चौक, लाल चौकी, कोळसेवाडी, काटेमानिवली येथे वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी उभे राहण्याऐवजी पाच ते सहा वाहतूक पोलिसांची टोळकी मोक्याची ठिकाणे असलेल्या दुर्गाडी पूल, पत्रीपूल, तिसगाव नाका या ठिकाणी उभी राहून चिरीमिरी वसूल करीत असतात, असे नागरिकांकडून सांगण्यात येते. शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीत सुसूत्रता आणण्यासाठी पुरेसे वाहतूक पोलीस नसल्याने कल्याण शहर परिसरात सध्या सकाळपासून वाहतूक कोंडी दिसून येते, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  
कल्याण परिसरात सुमारे तीस ते चाळीस शाळा आहेत. बहुतेक शाळांच्या बस आहेत. या शाळा दुपारी साडेबाराच्या सुमारास सुटतात. त्यामुळे एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात शालेय बस शहरात फिरत असल्याने, त्यात रिक्षा, अन्य खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. याच काळात अवजड वाहने शहरातून ये-जा करतात. या वाहतूक कोंडीत शालेय बस दररोज अडकून पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांची दररोज शाळा भरते. मुलांना घेण्यासाठी थांब्यावर आलेले पालक, आजोबा शालेय बस वेळेवर येत नाही म्हणून तासन्तास ताटकळत राहतात. विद्यार्थी या रोजच्या जीवघेण्या प्रवासाने हैराण झाले आहेत. या रोजच्या घरी जाण्याच्या विलंबामुळे अनेकांना खासगी क्लासला जाणे होत नाही, असे काही पालकांनी सांगितले.