भारतातील जैवविविधता, वातावरण बदल आणि तत्सम गंभीर प्रश्नाविषयी समाजाच्या सर्व स्तरांत विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच वन, पर्यावरण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान एक्स्प्रेस-जैवविविधतेची गाडी’ २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत नाशिक रोड रेल्वेस्थानकावर येत आहे. या माध्यमातून समुद्री, वन, सूक्ष्मजीवजन्य आणि कृषी आदी क्षेत्रांतील जैवविविधतेचे पैलूंचे दर्शन प्रदर्शनाद्वारे होणार आहे.
विज्ञान एक्स्प्रेसचे हे १६ डब्यांचे चालते-फिरते प्रदर्शन मागील सात वर्षांपासून देश भ्रमण करीत आहे. पहिल्या चार यशस्वी टप्प्यानंतर पुढील टप्प्यात विज्ञान एक्स्प्रेस-जैवविविधता विशेष या उपक्रमाचे उद्घाटन दिल्ली येथे विज्ञान व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौड यांच्या उपस्थितीत झाले. रेल्वे सध्या सातव्या टप्प्यात ५७ स्थानकांवर आपल्या विज्ञानाचा खजिना देशातील नागरिकांसाठी खुला करीत आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही रेल्वे आली असून या माध्यमातून भारतीय जैवविविधतेचे दर्शन घडेल. हिमालयातील वाळवंटात बारा वर्षांनी एकदा फुलणारे फूल, निळ्या रक्ताचा आणि नऊ डोळ्यांचा खेकडा, जगातील सर्वाधिक तिखट मिर्ची आदी जैवविविधता एक्स्प्रेसच्या माध्यमातून समोर येईल. एस.ई.बी.एस.च्या १६ डब्यापैकी जैवविविधता दर्शविणारे आठ डब्बे वन व पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहेत. त्यात देशातील विविध भौगोलिक विभागांमध्ये पसरलेल्या जैवविविधतेची सखोल माहिती देण्यात
आली आहे. हिमालयोत्तर आणि हिमालय, गंगेचे खोरे, उत्तर पूर्व भारत, वाळवंट आणि सागरी किनारे, बेट आदींचा समावेश आहे. या जैवविविधतेची माहिती देताना त्याचा जीवनमानाशी असणारा संबंध, त्यांच्या संवर्धनात येणाऱ्या अडचणी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे ‘जलवायू परिवर्तन, जैवविविधता’ व पाणी तथा ‘ऊर्जा संरक्षण व संवर्धनाचे विविध पर्याय’ या विषयावर माहिती देणारे इतर डब्बे आहेत. जैवविविधता एक्स्प्रेसमधील एका डब्यात लहान मुलांकरिता बाल विभाग तयार करण्यात आला असून त्यामध्ये बालकांसाठी विज्ञानातील गोडी, पर्यावरण आणि गणित याविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच अन्य डब्यांत जैवविविधता बदल, पर्यावरण, विज्ञान आणि गणित यासारख्या विषयांमधील संकल्पना विविध प्रयोगांच्या माध्यमातून समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी खास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन या कालावधीत करण्यात आले आहे. याशिवाय विविध वयोगटांच्या अभ्यागतांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व उपक्रमांत नोंदणी करून सहभागी होता येईल. देशातील जैवविविधतेची माहिती, तिचा होणारा ऱ्हास यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रदर्शनातील माहिती विविध प्रतिष्ठित संस्थांच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रदर्शन समजून देणे, त्यांच्या प्रश्नांचे समाधान करणे, अभ्यागतांना सर्वतोपरी साहाय्य करणे यासाठी खास पथक कार्यान्वित राहील.
प्रदर्शन सर्वासाठी खुले असून ते नि:शुल्क आहे. अधिक माहितीसाठी शाळा, पालक व विद्यार्थ्यांनी प्रकल्प व्यवस्थापक ०९८२४४०५४०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ‘जॉय ऑफ सायन्स’ प्रयोगशाळेत सहभागी होण्यासाठी ०९४२८४०५४०८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या प्रदर्शनाचा विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान एक्स्प्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याच्या फलाटावर ही रेल्वेगाडी मुक्काम करणार आहे. त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मालधक्क्याच्या बाजूकडून प्रवेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.