विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने कार्यरत येथील विज्ञान प्रबोधिनीतर्फे ‘सायन्स फेस्टिव्हल २०१४’ अंतर्गत बुधवारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विज्ञान प्रबोधिनीतर्फे ‘संडे सायन्स स्कूल’ हा उपक्रम राबविला जातो. संडे सायन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रयोग, प्रात्यक्षिक आणि प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. नाशिक महापालिकेच्या साहाय्याने यशवंतराव चव्हाण तारांगण येथे ३० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन क्रॉम्प्टन ग्रीव्हज् लिमिटेडच्या महासंचालकांच्या हस्ते होणार आहे. ४ मेपर्यंत सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे. प्रदर्शन दरम्यान तारांगणतर्फे ‘नवीन क्षितिजे व अंतरीक्षाची सफर,’ ‘विस्मयकारी ब्रह्मांड’ हे माहितीपट मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतून दाखविले जातील. १ मे रोजी विज्ञान व गणिताचे तज्ज्ञ शिक्षक भास भामरे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. विविध गमतीजमती शिकवतील. २ मे रोजी अवकाश शास्त्रज्ञ अपूर्वा जाखडी मार्गदर्शन करतील. ३ मे रोजी महेंद्र दातरंगे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे बुवाबाजी, भोंदूगिरीचे प्रात्यक्षिकदाखवून त्यामागील विज्ञान विद्यार्थ्यांना समजावून सांगतील. याशिवाय एक्स्ट्रीम मशीन, रोबोट्स, अंडरस्टँडिंग युनिव्हर्स, हिडन युनिव्हर्स हे विज्ञानविषयक माहितीपट प्रदर्शनात दाखविण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले एअर प्रेशर रॉकेट, साबणाच्या बुडबुडय़ांचे यंत्र, रोबोट्स, सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे, तोफ आदी प्रकल्प प्रदर्शनात मांडले जातील. अधिक माहितीसाठी ९८२३११४७७२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.