पाण्यावर चालणाऱ्या सायकलपासून एरोमॉडेलिंग..अ‍ॅड्रॉइड अ‍ॅप्स कसे विकसित करावे इथपासून तर चांद्र वसाहती व अंतराळ निरीक्षणापर्यंत, याशिवाय ब्रम्हांडातील घडामोडींचा थरार विशेष शोव्दारे..
या सर्वाचा अनुभव आणि प्रत्यक्ष सहभाग विद्यार्थ्यांना येथील विज्ञान प्रबोधिनीतर्फे ‘सायन्स फेस्टिव्हल २०१५’ या विज्ञान प्रदर्शनामुळे घेण्यात आला. महापालिकेच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण तारांगणात उपमहापौर गुरूमीत बग्गा यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कार्बाइड तोफेचा धमाका करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना एरोमॉडेलिंगची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. रवी शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना विमानाचे विविध भाग व त्यांचे कार्य याबद्दल माहिती दिली. दुसऱ्या दिवशी अ‍ॅड्रॉइड अ‍ॅप्स कसे विकसित करावे या विषयावरील कार्यशाळेत इयत्ता १० वीत शिकणाऱ्या निलय कुलकर्णीने मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी कल्पना युथ फाऊंडेशनद्वारे चांद्र वसाहती व अंतराळ निरीक्षण आणि त्यासाठी उपयोगी अ‍ॅप्स या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. फाऊंडेशनतर्फे अपूर्वा जाखडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना चांद्र वसाहती व अंतराळ भ्रमणासंबंधी विविध चित्रफिती दाखविण्यात आल्या. जाखडी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले रोबोट, पाण्यावर चालणारी सायकल, डोरेमॉन बबल मशिन, क्रेन, हवेच्या दाबावर उडणारे रॉकेट, पिण्याचे पाणी वाटणारा रोबोट, ज्वालामुखी, हायड्रॉलिक जेसीबी, सोलर कार, जलविद्युत निर्मिती, इंजिन, हवामान वेधशाळेतील उपकरणे, सौर माला, अंधारात चमकणारे पाणी, फुले व कपडे, एलिफंट टूथपेस्ट असे प्रकल्प मांडण्यात आले होते. यादरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पाण्यावर तरंगणाऱ्या सायकलचे प्रात्यक्षिक गोदावरी नदीतील रामकुंडात दाखविण्यात आले. २५ लिटर क्षमतेच्या पाण्याच्या १२ बाटल्यांच्या सहाय्याने ही सायकल पाण्यावर तरंगते. मागच्या चाकाच्या स्पोक्स मध्ये लावलेल्या छोटय़ा प्रोपेलरच्या सहाय्याने ही सायकल पाण्यात पुढे सरकते. स्वप्नील राजगुरू, नील जैन, हर्ष मुंदडा, श्रेणिक मानकर, करण ओस्तवाल, रोहित तादलापुरे या विद्यार्थ्यांनी ही सायकल तयार केली. प्रदर्शनादरम्यान रोज सायंकाळी पाच वाजता तारांगणतर्फे ‘नवीन क्षितीजे व अंतरीक्षाची सफर’ ‘विस्मयकारी ब्रह्मांड’ हे शो दाखविण्यात आले.