साध्या व सोप्या पद्धतीने विज्ञान समजावून देण्यासाठी येथील क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंपनीने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फिरती प्रयोगशाळा कार्यान्वित केली आहे. त्या अंतर्गत रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान व जीवशास्त्राशी संबंधित सुमारे दीडशे प्रयोग विद्यार्थ्यांना करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या अनोख्या प्रयोगशाळेचे उद्घाटन गुरुवारी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
अंबड औद्योगिक वसाहतीतील नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर येथे झालेल्या सोहळ्यास जिल्हा शिक्षण अधिकारी नवनाथ औताडे, अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे विश्वस्त महावीर कटारिया, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्जचे (नाशिक) अध्यक्ष जयंतकुमार कुलकर्णी, कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख संजय जोरापूर उपस्थित होते. नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत प्रदीर्घ काळापासून कार्यरत असणाऱ्या क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंपनीतर्फे सामाजिक बांधीलकीतून अनेक उपक्रम राबविले जातात. नव्याने कार्यरत झालेली फिरती प्रयोगशाळा हा त्याचाच एक भाग. आरोग्य व शैक्षणिक सुविधा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दत्तक घेणे, समाजातील गरजू घटकांसाठी हितकारी कामे करणे, वृक्षारोपण, महिला सबलीकरण व युवकांसाठी रोजगार निर्मिती असे अनेक उपक्रम आजवर कंपनीने राबविल्याचे कुलकर्णी यांनी
नमूद केले.
फिरत्या प्रयोगशाळेचा लाभ जिल्हा परिषदेच्या शाळांना होणार आहे. शालेय जीवनात विज्ञान हा तसा क्लिष्ट विषय समजला जातो. वैज्ञानिक सिद्धांत, संज्ञा व प्रयोगांमुळे काही विद्यार्थी त्याची धास्ती बाळगतात. वास्तविक, साध्या सोप्या प्रयोगांच्या माध्यमातून हा विषय समजावून घेतला जाऊ शकतो. या संकल्पनेतून ही फिरती प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. क्रॉम्प्टन ग्रीव्ह्जची फिरती प्रयोगशाळा दररोज इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शाळांना भेट देईल. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या परवानगीने ४० शाळांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी साधारणत: आठ ते दहा हजार विद्यार्थी फिरत्या प्रयोगशाळा उपक्रमाचा लाभ घेऊ शकतील. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवला जाणार असल्याचे क्रॉम्प्टन ग्रीव्ह्जच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.