एमआयडीसीने औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी ठाणे जिल्हय़ातील बेलापूर पट्टय़ामधील जमीन कवडीमोल भावाने भूमिपुत्रांकडून संपादित केल्या. या पट्टय़ामध्ये दिघा, रबाले, नेरुळ, महापे, बोनकोडेसारख्या ठिकाणी एमआयडीसीने विविध कंपनींना प्लॉट विकले असून या ठिकाणी उद्योजकांनी लघू व कुटीर उद्योग सुरू केले. मात्र त्यातील अनेक उद्योगांना घरघर लागली असून अनेक कंपन्या बंद अवस्थेत आहेत.
या बंद कंपन्यांतील भंगार चोरणारे छोटे चोर आता भाई झाले असून दिघा एमआयडीसीतील बहुतेक पडीक भूखंडांवर कब्जा करून त्या ठिकाणी अनधिकृतपणे गोदामे उभी केली आहेत. दिघा एमआयडीसीमधील चिंचपाडा, यादवनगर या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी मोकळे भूखंड होते.
हे भूखंड भूमिपुत्राकडून सरकारने संपादित केल्या आहेत. मात्र सध्या या भूखंडावर भंगार विक्रेत्यांनी लोखंड, काचा, पत्रे, प्लास्टिकची मोठीमोठी गोदामे थाटली आहेत. कुणालाही न जुमानता भंगारमाफियांचा हा व्यवसाय सुरू आहे. या भंगार विक्रेत्यांचा मुख्तार अन्सारी हा भंगारमाफिया पुढारी आहे. अन्सारी एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याच्यावर रबाले, रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.
एकाच महिन्यापूर्वी त्याला भंगारचोरीच्या गुन्हय़ात रबाले एमआयडीसी पोलिसाकडून अटक करण्यात आली होती. राजकीय वरदहस्त असल्यामुळे या भंगारमाफियावर ठोस कारवाई होत नसल्याने त्याचे धंदे जोरात सुरू आहेत. एमआयडीसीकडून अनेकदा पोलीस बंदोबस्तात या भंगार गोदामांवर कारवाई करण्यात येऊन भूखंड मोकळे करण्यात आले.
एमआयडीसीने यादवनगर, चिंचपाडा या ठिकाणी जानेवारी २०१३ पासून ५ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत ३५ वेळा कारवाई करीत जवळपास अडीच हजार गोदामे जमीनदोस्त केली. या कारवाईसाठी २५ लाख रुपये  खर्च करण्यात आले. मात्र या पथकाने पाठ फिरवताच पुन्हा गोदामे उभी राहत असल्याने एमआयडीसीचे अधिकारीदेखील हतबल झाले असून लाखो रुपयांचा हा सर्व खर्च वाया जात आहे. यातच निवडणुकीच्या काळामध्ये भंगारच्या गोदामावर कारवाई थंडावल्याने भंगारमाफियांचे चांगलेच फावले आहे.