२०१३-२०१४ च्या संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरविण्यासंदर्भात शासनाकडून कार्यवाही केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नाशिक विभागातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आपल्यावरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले.
काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याचा शासनाचा घाट असून शिक्षण मंत्र्यांबरोबर यासंदर्भात चर्चा सुरू असली तरी शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे परिषदेने म्हटले आहे. २०१३-१४ च्या संच मान्यतेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक आकृतीबंधाच्या विरोधातही न्यायालयात याचिका दाखल आहे. उच्च न्यायालयाने २०१३-१४ ची संच मान्यता आणि शिक्षकेतरांच्या आकृतीबंध कार्यवाहीस स्थगिती दिली असूनही शासनाकडून न्यायालयीन आदेशांचे पालन करण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२०१३-१४ च्या संच मान्यतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरवू नये तसेच २०१२-१३ च्या संच मान्यतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर पदे कायम ठेवावी, शालार्थ वेतन प्रणालीत सर्व शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने काढण्यात यावे, अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने काढण्यात येऊ नये, शालार्थ वेतन प्रणालीनुसार वेतन देयक ऑनलाईन सादर होऊनही वेतन एक तारखेस दिले जात नाही. वेतन नियमित एक तारखेस मिळावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. ग्रंथपाल पदास १९९० च्या शासन निर्णयानुसार संरक्षण असूनही ग्रंथपाल अर्धवेळ पद दाखवून पूर्णवेळ ग्रंथपालास अर्धवेळ करण्यात येत आहे. प्रत्येक शाळेत पूर्णवेळ ग्रंथपाल मिळावा तसेच ग्रंथपाल पदाचे संरक्षण कायम ठेवावे, उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठांसह सर्वोच्च न्यायालयाने पदवीधर ग्रंथपालांसाठी मान्य केलेली बी. एड्. वेतनश्रेणी त्वरित लागू करून न्यायालयीन आदेशांचे पालन करण्यात यावे. शासनाचा २३ ऑक्टोबर २०१३ रोजीचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असलेला सुधारित आकृतीबंध रद्द करावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवू नये, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासीत सेवातंर्गत प्रगती योजना लागू करण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय होऊनही योजना अद्याप लागू केलेली नाही. ही योजना त्वरित लागू करावी, या मागण्यांसाठी परिषदेचे कार्यवाह डी. यू. अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गुलाब भामरे, नरेंद्र ठाकरे, दत्ता पाटील, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.