कळंबोली येथील सेंट जोसेफ विद्यालयामध्ये शुक्रवारी सातवी इयत्तेमध्ये शिकणारा विघ्नेष साळुंखे या विद्यार्थ्यांच्या सहाव्या मजल्यावरून पडून झालेल्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमुळे खांदा कॉलनीत सहा महिन्यांपूर्वी न्यू होरायझन पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचा चौथ्या मजल्यावरून पडून झालेल्या मृत्यूने त्या भयावह आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचेही कारण अद्यापही स्पष्ट न झाल्याने पनवेलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये सहा महिन्यांपूर्वी गौरव कंक हा सहावीचा विद्यार्थी चौथ्या मजल्यावरून पडला होता. शुक्रवारी कळंबोली येथील सेंट जोसेफ विद्यालयातील विद्यार्थी विघ्नेश साळुंके ही घटनाही त्याला साधम्र्य असल्याचे आढळून आले आहे. या दोन्ही घटनांमध्ये संबंधित खिडकी व जिन्यांच्या पॅसेजला लोखंडी ग्रील नसल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. घटना घडूनही शैक्षणिक संस्थाचालकांनी अद्यापही विद्यालयांच्या खिडक्यांना व पॅसेजला ग्रीलने झाकलेले नाही.
२४ फेब्रुवारी रोजी गौरव कंक या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतरही तीन दिवस विद्यालय बंद ठेवण्यात आले होते. पालकांनी या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाला धारेवर धरल्यानंतर गौरवच्या मृत्यू प्रकरणात एका शिक्षिकेला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला जामिनावर सोडण्यात आले. गौरवच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस तपास करीत आहेत. गौरवने कोणत्या कारणामुळे उडी मारली, किंवा त्याला कोणी प्रवृत्त केले याचा छडा अद्याप लागलेला नाही.
कळंबोली येथील सेंट जोसेफ विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरून याआधीही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. २१ जून २०१० रोजी याच विद्यालयामध्ये तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकानेच बलात्कार केल्याचा गुन्हा शिक्षकावर दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही विद्यालय व्यवस्थापनाविरोधात पालकांनी व रहिवाशांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर मुख्याध्यापिका मीरा कुंटे यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर पाच वर्षांनंतर विघ्नेषचा मृत्यू झाल्याची घटना घडली. २०१० साली दोषी ठरलेल्या मीरा कुंटे त्याच पदावर आजही काम करीत आहेत याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येते. विद्यालय व्यवस्थापनाचा हा हलगर्जीपणा की आणखी काही याबाबत पोलीस तपास करीत असले तरी त्या शुक्रवारी विघ्नेष पळत सहाव्या मजल्यावर का गेला यासाठी पोलिसांनी शाळेमधील कर्मचाऱ्यांकडे तपास सुरू केला आहे. तसे सीसीटीव्ही फूटेज पोलीस तपासत आहेत.
सिडकोकडून वाढीव चटई क्षेत्र घेऊन या दोन्ही विद्यालयांनी आपल्या इमारती वाढविल्या आहेत. मुळात विद्यालयांसारख्या इमारती उंच बांधण्याच्या परवानग्या सिडकोच्या बांधकाम विभागाने कशा दिल्या आणि खरंच तशी गरज आहे का हा प्रश्न पालकांना पडला आहे. शाळेत मान्यवरांना इमारतींचे मजले चढण्यासाठी उद्वाहकाची सोय सेंट जोसेफ विद्यालयात आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी पायऱ्याने चढून जाण्याचे आदेश आहेत; असा दुजाभाव का याबाबतही पालक संताप व्यक्त करीत आहेत.