भारतातील लोकनियुक्त प्रतिनिधी संचलीत लोकशाही ही आभासी असून त्यावर ‘आहे रे’ वर्गाचा प्रभाव आहे. त्यामुळेच देशात गरीबी आणि विषमता वाढत आहे. ग्रामीण भागात सेवा सुविधा पुरविताना ‘इलेक्टेड’ पेक्षा ‘सिलेक्टेड’ लोकशाहीच उपकारक ठरते, असे प्रतिपादन वर्धा येथील सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उल्हास जाजू यांनी अंबरनाथ येथील वैद्यकीय परिषदेत केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंबरनाथ-बदलापूर शाखेच्या वतीने अंबरनाथमधील सूर्योदय सभागृहात रविवारी एकदिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली            होती.
सकाळच्या सत्रात डॉ. जाजू यांनी सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य सेवेविषयी माहिती दिली.
परिसरातील ४० गावांमध्ये त्यांनी अतिशय परिमाणकारकपणे ही योजना राबवली. त्यामुळे गेल्या २५ वर्षांत या भागात कुपोषण नाही.
या योजनेत प्रत्येक गावकऱ्यांना आपापल्या ऐपतीप्रमाणे धान्य देऊन या योजनेत सहभागी होता येते. त्याबदल्यात त्यांनी रुग्णालयाच्या वतीने वर्षभर आरोग्य सुविधा दिली जाते.  रुग्णालयाच्या औषधपेढीतून तब्बल ४० टक्के सवलतीत रुग्णांना औषधे दिली जातात. आरोग्य सुविधेनंतर आता याच परिसरात जलसंधारण, दारूबंदी आदी विषयांबाबतही काम सुरू आहे. ग्रामपंचायतीपेक्षा ग्रामसभा अधिक परिमाणकारकपणे काम करते, असेही डॉ. उल्हास जाजू यांनी सांगितले.