चैन पूर्ण करण्यासाठी वा ऐषोआरामासाठी पत्नीचे दागिने विकणे आणि पैसा हाती आला तरी पत्नी वा मुलांची काळजी न घेणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ही पतीची वागणूक म्हणजे पत्नीप्रती एकप्रकारचे क्रौर्यच आहे, असे स्पष्ट करत याच कारणास्तव पत्नी घटस्फोट मागू शकत असल्याचा निर्वाळा कुटुंब न्यायालयाने दिला आहे. तसेच कुटुंबाप्रती पतीची बेफिकीर वागणूक आणि त्याच्या स्वार्थी स्वभावाला कंटाळून १६ वर्षांनंतर काडीमोडासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या महिलेला न्यायालयाने याच कारणास्तव घटस्फोट मंजूर केला.
मे १९९९ मध्ये या दाम्पत्याचा विवाह झाला होता. पतीला सुरुवातीपासूनच ऐषोआरामाचे जीवन जगण्याची हौस होती, तर ती मात्र साधे राहणीमान व सर्वसामान्य घराशी संबंधित होती. लग्नानंतरही त्याचे हे ऐषोआरामाचे जगणे सुरूच होते आणि सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तो त्यात रममाण होता. दरदिवशी तो नशेतच घरी परतत असे. एके दिवशी तर तो गटारात पडला असल्याचे तिला शेजाऱ्यांनी कळवले. ददरोज अशा लाजिरवाण्या स्थितीत राहणे खूप कठीण असतानाही तिने परिस्थितीशी जुळवून घेतले. पण त्याचा हा बेफिरीपणा सुरूच होता. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेलेली असताना त्याने अर्धे घर भाडय़ाने दिले. त्यामुळे बाळ जन्मल्यानंतर घरी परतून तेथे राहणे तिच्यासाठी आणखीनच कठीण होऊन बसले होते. एकदा तर पैसे संपले म्हणून त्याने कशाचाही विचार न करता थेट तिचे दागिनेच विकले. आपल्या चैनीच्या जीवनात त्याला पत्नी वा मुलाची कधीही काळजी केली नाही. त्यांना काय हवे काय नाही याचाही विचार केला नाही. त्यासाठी चैन पूर्ण करणे एवढेच एक ध्येय होते आणि त्यातच तो कायम रमलेला असायचा. १६ वर्षे हे सहन केल्यानंतर अखेर आपण यातून सुटका करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली होती. तसेच त्याची ही वागणूक आपल्यासाठी मानसिक क्रौर्यच होते, असा दावा तिने घटस्फोटाची मागणी करताना केला होता.
तिच्या अर्जाची आणि आरोपांची दखल घेत न्यायालयाने पतीला वारंवार नोटीस बजावून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. मात्र त्याच्याकडून एकदाही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळेच तिने केलेल्या आरोपांत तथ्य असून पतीची तिच्याशी वागणूक क्रौर्यच असल्याचे स्पष्ट करत न्यायालयानेही तिला घटस्फोट मंजूर केला.