महाराष्ट्रातील संतांच्या कार्यापासून मन आणि शरीर यांच्या संबंधांपर्यंत, तसेच ज्येष्ठ नागरिकांची अध्यात्माकडे असलेली ओढ उलगडून दाखवितानाच देशातील महानता सर्वासमोर मांडण्याचे कार्य येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष आणि पंचवटी सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेमार्फत करण्यात आले.
व्याख्यानमालेचे उद्घाटन अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठांच्या अनुभवाचा समाजाने उपयोग करून ज्ञानात भर टाकावी. ‘जुन ते सोनं’ याप्रमाणे ज्येष्ठांनी आपले जीवन आनंदी करावे, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. निला पांढरे यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हा विषय मांडतांना महाराष्ट्रातील संतांच्या उज्ज्वल परंपरेचा उल्लेख केला.ो धर्माच्या प्रचारासाठी संतांनी साहित्य निर्माण केले. संतांनी भक्तिमार्ग दाखविला. सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोहचविण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले. मराठी भाषेला गौरव प्राप्त करून दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. प्रा. यशवंत पाटील यांनी ‘वेध मनाचा,शोध सुखाचा’या विषयावर माहिती देताना जीवनाचे चार टप्पे विषद केले. ज्येष्ठांची अवस्था ही चौथी अवस्था आहे. वेध घेणे म्हणजे मनाच्या अंतरंगाचा शोध घेणे होय. मन बाजूला केल्यास शरीर चैतन्यहीन होईल. दुसऱ्याच्या मनाचा शोध सहज घेता येत नाही. मनाचे विविध असे स्तर आहेत. मनाशी प्रामाणिक राहिल्यास जीवनात यश नक्कीच मिळेल. मन चांगले तर जग चांगले. मनाला चांगल्या सवयी लावा, असा उपदेश त्यांनी केला.
‘ज्येष्ठ नागरिक आणि अधात्म’ यांवर बोलताना अ‍ॅड. भाऊसाहेब गंभिरे यांनी चिता माणसाला मेल्यावर जाळते तर चिंता माणसाला जिवंतपणीच जाळते, असे नमूद केले. आपले जीवन मावळतीकडे झुकलेले असते. अशावेळी संतांच्या सहवासात गेल्यास सुख मिळते. दुसऱ्याच्या सुखात सहभागी झाल्यास आपलेही नैराश्य नष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. डॉ. बापूराव देसाई यांनी ‘मेरा भारत महान’ या विषयात देशाचे महत्व मांडले. भारत विविधतेने नटलेला असून त्यात कोणत्याही जाती-धर्माचा भेदभाव केला जात नाही. या देशात प्राण्यांमध्येही विशेषता आहे. अध्यात्माची गोडी देशात आहे. तत्वज्ञान व नीतीमूल्यांष्ठीत विचारांचा हा देश नक्कीच महान असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी केंद्र कार्यवाह नथुजी देवरे यांनी प्रास्तविक केले. हिरालाल परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. के. के. मुखेडकर यांनी आभार मानले.