गंभीर तसेच नियमित अपघात घडणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेऊन त्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करणे, खड्डे आणि धोकादायक वळणांवर सूचना फलक आणि वाहतूक पोलिसांचा सन्मान व जनजागृती अभियान आदींमुळे मुंबईतील अपघातात गेल्या अनेक वर्षांनंतर घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ४१८ ने कमी झाली असून अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्याही २३ ने कमी झाल्याचे वाहतूक विभागाचे सहआयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्पष्ट केले.
मुंबईत होणाऱ्या अपघातांची दरवर्षीची आकडेवारी पाहिल्यास त्यात सतत वाढ होत असल्याचे दिसून येत होते. मात्र यंदा जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीतील आकडेवारीचा आढावा घेतला असता त्यात घट झाल्याचे दिसून आले. विविध प्रकारच्या उपाययोजनांमुळेहे शक्य झाल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. कुलाबा, वडाळा, नागपाडा, भोईवाडा, माटुंगा, चेंबूर, विक्रोळी, वांद्रे, डी. एन. नगर, वाकोला, विमानतळ, गोरेगाव वाहतूक पोलीस हद्दीतील प्राणांतिक अपघातांच्या ठिकाणांचा आढावा घेऊन या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात केल्याचा परिणाम दिसून आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत गंभीर अपघातांमध्ये २३ ने घट झाली आहे. आणखी काही ठिकाणांचाही आढावा घेण्यात आला असून मुंबईत किमान गंभीर अपघात होऊ नयेत, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. गंभीर अपघात हे फक्त मध्यरात्री वा पहाटेच्या वेळीच होत असून ते रोखण्यासाठी काय करता येईल, याचा विचार सुरू असल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.
कांदिवली, घाटकोपर, साकीनाका, बोरिवली, पायधुनी या ठिकाणी गंभीर अपघातांमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ क्षुल्लक असली तरी या ठिकाणांचाही आढावा घेऊन गंभीर अपघात कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय मालाड, कांदिवली, बोरिवली, भायखळा, वडाळा, वरळी या अपघातांच्या नव्या ठिकाणांचाही आढावा घेतला जाणार आहे, असेही डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले.