पिकतं तिथं विकत नाही, अशी जुनी म्हण आहे. वस्तू मुबलक आहेत, तेथे त्यांना किंमत नसते, तसेच काहीसे मराठीचे असावे. महाराष्ट्र म्हणजे मराठी, असे समीकरण जुळल्यानंतर ती बोललीच पाहिजे. मराठीत पुस्तके वाचलीच पाहिजेत, असे काही कोणावर बंधन नाही. केवळ मराठी भाषा दिनी मराठीचे कौतुक संतांचे दाखले देऊन केले जातात. या दिनाचे औचित्य पाळत कार्यक्रम करायची, ही आपल्याकडची औपचारिकता झाली आहे. मात्र, मराठीपण केवळ राहणीमानाच्या दृष्टीनेच नव्हे, तर तिचे शैक्षणिक पातळीवर संवर्धन करण्याचे प्रयत्न बृहन्महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील मराठी प्राध्यापक मंडळी फार नेटाने करीत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून उमगले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी विभागात अजूनही आंतरविद्याशाखीय शिक्षणाची कवाडे उघडली गेलेली नाहीत. आपल्याकडे मराठी विभागात आंतरविद्याशाखीय शिक्षण नसल्याचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे यांनी सांगितले. बृहन्महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या राज्यातून अभियांत्रिकी, एमसीए, एम.टेक. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी आंतरविद्याशाखेंतर्गत मराठी भाषा अवगत करून घेण्यासाठी विशेष निवड करतात, असे बडोदा विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा.डॉ. संजय करंदीकर यांनी सांगितले. त्यांच्याकडे थोडेथोडके नसून तब्बल १५० विद्यार्थ्यांनी मराठीची निवड केली आहे. त्यात पंजाबी, बंगाली, कन्नड, तामिळ, ईशान्येकडील विद्यार्थी आहेत. आंतरविद्याशाखेंतर्गत त्यांनी मराठी विषय निवडला आहे. त्यांची स्वत:ची मातृभाषा वेगळी आहे. ते इंग्रजीतून शिक्षण घेत आहेत आणि त्यांना मराठी शिकायची हौस आहे, असे विचित्र वाटत असले तरी त्यांना आपली भाषा शिकवायचा आनंद वाटतो. अर्थात, त्यांना शिकवणे मोठे आव्हान आहे. सर्वप्रथम त्यांना एका सामाईक पातळीवर आणण्यासाठी इंग्रजीतून शिकवावे लागते. अगदी बालवाडीतल्या मुलांसारखे. ‘मँगो’ला मराठीत ‘आंबा’ म्हणतात आणि ते शिकवण्यासाठी आम्हा प्राध्यापकांची कसरत आणि कस लागते तेव्हा ते किती कठीण आणि मजेशीर होऊन बसते, याचा आनंद पहिले सहा महिने आम्ही घेतो, असे करंदीकर म्हणाले.
कर्नाटकच्या गुलबर्गा विद्यापीठातील मराठी विभागातील प्रा.डॉ. विजया तेलंग यांचाही असाच अनुभव आहे. त्यांच्याकडे २६ विद्यार्थी वेगवेगळ्या विद्याशाखेतील आहेत. ग्रंथालय विज्ञान, समाजशास्त्र, लोकप्रशासन, अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनी मराठी शिकण्यासाठी आंतरविद्याशाखेंतर्गत मराठीचा पर्याय निवडला असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राप्रमाणेच सीबीएसई आणि इतर प्रादेशिक भाषांचा प्रभाव मराठी कुटुंबांवरही असल्याच्या सामाईक प्रतिक्रिया करंदीकर आणि तेलंग यांच्या होत्या. मात्र, त्यातल्या त्यात वाळवंटात ओअ‍ॅसिस फुलावे, तसे इतर राज्यात आंतरविद्याशाखेंतर्गत आम्हाला मराठी अध्यापनाचा आस्वाद घेता येतो, याचा आनंद डॉ. करंदीकर आणि डॉ. तेलंग यांनी व्यक्त केला.