महात्मा गांधी यांच्या वर्धा जिल्ह्य़ातील आगमनास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या प्रीत्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीला सन २०१८ मध्ये १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्याने सेवाग्राम परिसरातील क्षेत्राचा विकास करण्याचे शासनाने ठरवले आहे. त्याला ‘सेवाग्राम विकास आराखडा’ असे नाव देण्यात आले असून महात्मा गांधी यांच्या विचाराला अनुरूप या क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी शासन ४९० कोटी रुपये खर्च करणार आहे. हा प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे नियोजन राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या सेवाग्राम विकास आराखडय़ामध्ये वर्धा, पवनार व सेवाग्राम परिसराचा समावेश आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक गांधीवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी वर्धा जिल्ह्य़ात येत असतात. त्यासाठी सेवाग्राम व वर्धा परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक संकल्पना तयार करण्यात आली. यासाठी एक सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष नियोजन खात्याचे राज्यमंत्री राहणार आहेत. सदस्य म्हणून नागपूरचे विभागीय आयुक्त, वर्धा जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे अधीक्षक अभियंत्याचा समावेश आहे. तसेच सेवाग्राम विकास आराखडय़ासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी वर्धाचे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, नागपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आणि वर्धा जिल्ह्य़ाच्या नियोजन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शासन निर्णयानुसार या समितीकडे वास्तुकाराची नियुक्ती व विकास आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार सेवाग्राम येथे ‘गांधी रिसोर्स सेंटर/ गांधी फॉर टुमारो’ सेंटरसाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. वरुड येथील ३ हेक्टर ०५ आर जमीन सेवाग्राम आश्रमने स्वीकारावी व जमिनीचे हस्तांतरण करावे, असे ठरवण्यात आले. सेवाग्राम विकास आराखडय़ानुसार काम करण्यासाठी एकूण दहा संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी मुंबई येथील मे.अडारकर असोशिएटस इपिकॉन्स कन्सलटंट प्रा. लि. ची गुणानुक्रमे निवड करण्यात आली असल्याचेही मुळक यांनी यावेळी सांगितले. ही संस्था बापू कुटीला कुठलेही नुकसान पोहचणार नाही, या दृष्टीने नवीन बांधकाम करेल. हे बांधकाम म. गांधी यांच्या विचारसरणीला अनुसरूनच राहणार आहे.
पत्रकार परिषदेला विभागीय आयुक्त अनुपकुमार, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. मा.म. गडकरी, नीरा अडारकर, श्रीकांत बारहाते प्रामुख्याने उपस्थित होते.