मुंबई महापालिकेमध्ये नोकरी मिळविल्यानंतर काही दिवसातच महागडय़ा मुंबईची हवा सोसेनाशी झालेल्या कर्मचाऱ्यांनी ‘गडय़ा आपुला गाव बरा..’ म्हणत थेट सरकार दरबारी बदलीसाठी अर्ज करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मुंबई महापालिकेतून थेट औरंगाबाद, नांदेड, नागपूर महापालिकेत बदली मिळावी म्हणून शेकडो कर्मचाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे अर्ज केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अखेर अशी अर्जबाजी करून बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी पालिकेवर परिपत्रक जारी करण्याची वेळ आली आहे.
मुंबई महापालिकेत नोकरी मिळाली म्हणजे आयुष्याचे सोने झाले, असा समज गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झाला आहे. त्यामुळे केवळ मुंबईकरच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर शहरांतील नागरिकही मुंबई महापालिकेत नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. आजघडीला विविध शहरांमधील नागरिक मुंबई महापालिकेच्या सेवेत रूजू आहेत. पूर्वी रूजू झालेले कर्मचारी इमाने इतबारे सेवेत कार्यरत राहून निवृत्त झाल्यानंतर गावची वाट धरत होते. परंतु आता हळूहळू कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलू लागली आहे.औरंगाबाद, नांदेड, नागपूर आदी शहरांतील नागरिक मुंबई महापालिकेत नोकरी करीत आहेत. महापालिकेकडून बक्कळ वेतन आणि इतर फायदे मिळत असले तरी महागडय़ा मुंबापुरीत ते अपुरे पडू लागले आहेत. कार्यालयात पोहोचण्यासाठी होणारी दगदग असह्य़ होऊ लागली आहे. त्यामुळे पालिकेतील काही कर्मचारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. पालिकेतील लठ्ठ पगाराची नोकरी सोडवत नाही आणि गावाकडे नोकरी मिळण्याची शाश्वती नाही अशा कात्रीत हे कर्मचारी अडकले आहेत. मात्र आता मुंबईत राहायचे नाही असा पक्का निर्धार या मंडळींनी केला आहे. मुंबई महापालिकेतून प्रतिनियुक्तीवर काही अधिकाऱ्यांची अन्य महापालिकांमध्ये बदली केली जाते. मात्र संबंधित अधिकाऱ्याची क्षमता आणि तेथील महापालिकेतील उपयोगिता पाहून ही प्रतिनियुक्ती होत असते.
मात्र मुंबई नकोशी झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीचा हा पर्याय हवासा झाला आहे. थेट आपल्या गावातील महापालिकेत बदली मिळाली तर नोकरीही राहील आणि गावात आपल्या कुटुंबासमवेत राहता येईल, अशी शक्कल लढवित या कर्मचाऱ्यांनी पालिकेला डावलून थेट नगरविकास खात्याकडे अर्ज केले आहेत. तसेच अर्जाची प्रत संबंधित विभागप्रमुखाच्याही हातावर ठेवली आहे.
या वाढत्या प्रकारामुळे पालिकेतील अधिकारी मंडळी त्रस्त झाली आहेत. अशा पद्धतीने अन्य महापालिकांमध्ये बदली करण्याची प्रथा वा नियम मुंबई महापालिकेत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बदली मिळणे अशक्य आहे. मात्र अशा अर्जबाजीला तात्काळ आळा बसावा यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. कर्मचाऱ्यांनी असे अर्ज करू नयेत, असे त्यात स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे नोकरीसह गावची वाट धरण्याचा विचार कर्मचाऱ्यांना सोडून द्यावा लागणार आहे.