‘शब्द, द बुक गॅलरी’ आणि ‘मुक्त शब्द मासिक’ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अनुवादित साहित्यासाठी देण्यात येणारा ‘दुर्गा भागवत शब्द पुरस्कार’ करुणा गोखले यांना ‘द सेकंड सेक्स’ (मूळ लेखक- सिमॉन द बोव्हुआर) या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झाला आहे. हे पुस्तक पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुरस्कारासाठी ज्ञानदा देशपांडे, नितीन िरढे, दीपक घारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
बाबूराव बागूल शब्द पुरस्कार किरण गुरव लिखित ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. हे पुस्तक शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. या पुरस्कारासाठी रेखा इनामदार-साने, हरिश्चंद्र थोरात, रंगनाथ पठारे यांनी काम पाहिले. लेखन कारकिर्दीसाठी देण्यात येणाऱ्या ‘भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कारा’साठी नंदा खरे यांची निवड करण्यात आली आहे. ऐतिहासिक कादंबरीतील उल्लेखनीय कार्यासाठीच्या या पुरस्कारासाठी दिगंबर पाध्ये, नितीन रिंढे, हरिश्चंद्र थोरात यांनी काम पाहिले.भारतीय भाषांमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल यंदाच्या वर्षीपासून ‘नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी ज्येष्ठ हिंदूी कवी विष्णू खरे यांची निवड करण्यात आली आहे. प्रफुल्ल शिलेदार, रणधीर शिंदे, राहुल कोसंबी यांच्या निवड समितीने ही निवड केली.या पुरस्कारांचे वितरण ३ मे रोजी लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बोरिवली (पश्चिम) येथील प्रबोधन ठाकरे मिनी थिएटर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास डॉ. आ. ह. साळुंखे, कॉम्रेड गोविंद पानसरे हे उपस्थित राहणार आहेत.