लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्यात झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत रोखण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाना परी प्रयत्न करीत असून नवी मुंबई पालिका पक्षाच्या ताब्यात पुन्हा राहावी यासाठी शहरी भागात जास्त लक्ष देण्याऐवजी ग्रामीण व झोपडपट्टी भागात लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी येथील पक्षाचे सूत्रधार माजी मंत्री गणेश नाईक यांना केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी एका खासगी संस्थेद्वारे शहराचा कल जाणून घेतल्याचे समजते. दरम्यान लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उच्चभ्रू असलेल्या पामबीच, वाशी सेक्टर सात, १४, १७, सीबीडी आर्टिस्ट व्हिलेज या भागात पिछाडीवर पडला होता. त्यामुळे अशा भागात विनाकरण श्रम वाया दवडण्यापेक्षा ग्रामीण व झोपडपट्टीत लक्ष घालण्याची पवारनीती सांगण्यात आली आहे. त्यात माथाडी मते निर्णायक असलेल्या १८ जागांवर पक्षाला यश मिळण्याची खात्री आहे. झोपडपट्टीत १७ आणि ग्रामीण भागात २९ असे ४६ प्रभाग आहेत तर शहरी भागात ६५ प्रभाग आहेत.
नवी मुंबई पालिकेची २२ एप्रिल रोजी पाचवी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. केंद्र आणि राज्यातील निवडणुकानंतर नवी मुंबईकरांना या तिसऱ्या निवडणुकीचा सामना करावा लागत आहे. यामागील दोन्ही निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस आणि त्याचे सावत्र भावंड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सपशेल झिडकारले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यात शहरी भागातील मतदरांचा टक्का मोठा आहे. नवी मुंबई ग्रामीण, शहरी आणि झोपडपट्टी अशा तीन वसाहतींचे बनलेले नगर आहे. त्यामुळे यातील ग्रामीण व झोपडपट्टी भागांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. अठरापगड जातीच्या नवी मुंबईत कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही पण लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मागे उभा राहिलेला येथील अमराठी मतदार शिवसेनेला जवळ करणार नाही असे या पाहणीतून दिसून आले आहे. त्यांना भाजप हा आता जवळचा पक्ष वाटत असला तरी त्याचे शहरात सर्वत्र उमेदवार नसल्याने हा मतदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे वळण्याची शक्यता आहे. असे या पाहणीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना पुणे येथील शहरी भागात न पडलेले मतदानाचे कारण पुढे करण्यात आले आहे. पवार यांचा सल्ला शिरसावंद्य मानून नाईक व त्यांच्या दोन चिरंजीवांनी शहराच्या या दोन भागांत जास्त लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे झोपडपट्टीत प्राबल्य असलेल्या नगरसेवकांना अधिक स्वातंत्र्य देताना त्यांनी मागितलेल्या जागा दिल्याचे दिसून येत आहे. यात गवते, सोनावणे आणि कुलकर्णी दाम्पत्याचा समावेश करता येण्यासारखा आहे. सोनावणे यांना रबाळे येथे पांठिबा देण्यात आला आहे तर कुलकर्णी यांनी सुचवल्याप्रमाणे सहा प्रभागांत उमेदवारी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात २९ प्रभाग असून हे ८० टक्के प्रकल्पग्रस्त लोकसभा विधानसभा निवडणुकीत क्लस्टर या विषयावरून नाईकांच्या विरोधात गेले होते. त्यामुळे नाईक यांना त्यांच्या आगरी बहुल भागामध्येदेखील फटका बसल्याचे दिसून आल्याने ग्रामीण भागात ‘तुमचा माणूस’ असा प्रचार करताना या वेळी युती शासनाने जाहीर केलेल्या क्लस्टर योजनेला विरोध करण्यात आला आहे. गरजेपोटी घरे बांधलेल्या किंवा भाडय़ाने अथवा विकलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी मी सुचवलेली ही क्लस्टर योजना नाही, अशी भूमिका नाईक यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पुन्हा चुचकारण्याचे काम नाईक यांनी सुरू केले आहे. नवी मुंबईतून ‘सिडको हटाव, नवी मुंबई बचाव’ अशी नवी घोषणा नाईक यांनी दिली आहे. घणसोलीसारख्या मोठय़ा गावात शिवसेनेला चांगले वातावरण असताना तेथे उमेदवारी वाटपात पक्षाने कच खाल्याने त्याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादीला होणार आहे. हीच स्थिती तळवली, गोठवली, कोपरखैरणे, कोपरी या गावांत असून ४७ हजार झोपडय़ांची पुनर्बाधणीची हाक पुन्हा देण्यात आली आहे. या दोन फॅक्टरव्यतिरिक्त शहरात ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, नेरुळ, तुर्भे या भागांत असलेला माथाडी कामगार हा पवार यांना मानणारा मोठा वर्ग असून तो १८ प्रभागात निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी पवार एक सभा घेण्याची शक्यता असून निवडणूक जिंकण्याचे तंत्र नाईक यांना शनिवारी देणार आहेत. माथाडीचे नेते आमदार शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील हे दोघे जातीने या माथाडी बहुल भागामध्ये तळ ठोकून आहेत. ग्रामीण, माथाडी आणि झोपडपट्टीचा मतदार राष्ट्रवादीसाठी धावून आल्यास पक्षाची शहरातील इभ्रत वाचण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे हे मिशन असताना सेना व भाजपने शहरी भाग पिंजून काढला आहे. त्यात माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या वैयक्तिक जनसंर्पकावर दिघा व ऐरोली झोपडपट्टी भागात पाच प्रभाग सेनेला मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे तर झोपडपट्टी व ग्रामीण भागांत खाते उघडणेही मुश्कील असून काँग्रेसचीही हीच गत होणार आहे.
विकास महाडिक, नवी मुंबई

ncp sharad pawar faction
आयात उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Prime Minister Narendra Modis meeting in Baramati Lok Sabha Constituency
‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम