मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी कारखाने हे शेतकऱ्यांची विकास मंदिरे मानून काम केले आहे. त्यांची बांधिलकी लक्षात घेऊन शेतकरी संघटनेने आपली भूमिका ठरवावी, असे आवाहन आमदार दिलीपराव देशमुख यांनी केले.
रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अॅड. त्र्यंबकदास झंवर, आमदार वैजनाथ िशदे, धनंजय देशमुख, एस. आर. देशमुख, विठ्ठलराव माकणे, अॅड. व्यंकट बेद्रे आदी उपस्थित होते.
दिलीपराव देशमुख म्हणाले, कारखाने बंद पाडणे म्हणजे शेतकऱ्याने स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे होय. शेतकरी संघटनेने शासन दरबारी दबाव वाढवून उसाचा दर सहमतीने ठरवून घ्यावा. शासन व शेतकरी संघटना यांची सहमती झाल्यानंतर मांजरा परिवारातील कारखान्याचा दर जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या वतीने ५० कोटी रुपये खर्चून १२ मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती सहप्रकल्प उभारला जाणार असून भविष्यात कारखान्याचे भांडवल १०० कोटी होईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे दु:ख व अडचणी कारखाना चालवणाऱ्या नेतृत्वाला दिसल्या पाहिजेत. निवाडय़ाच्या माळरानावर लोकनेते विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची समृद्धी व सुबत्ता वाढवण्यासाठी अतिशय कठोर निर्णय घेऊन, शिस्त पाळून ती संस्था उभारली. मराठवाडय़ात उसाला क्रमांक एकचा भाव देणे ही सामाजिक बांधिलकी असल्याचे मानून कारखान्यात काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
सहमतीचे राजकारण
मांजरा परिवारात सहमतीचे राजकारण होते. ‘पुढचे पाठ नि मागचे सपाट’ अशी भूमिका कधी घेतली जात नाही. संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचा चालक कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता तेथील शेतकरी माझे आहेत हे लक्षात घेऊन धोरण ठेवले गेले. समन्वयाचे राजकारण केल्यामुळेच कारखाना बंद पडू दिला नाही. ‘माळी बदलला तरी प्रथा बदलायची नसते’ ही बाब आपण लक्षात ठेवल्याचे ते म्हणाले.