हिंदुत्वाचा ‘टीआरपी’ वाढविण्यासाठीच शिवसेना उर्दूच्या निर्णयाला विरोध करीत असल्याची टीका आक्रोश या संघटनेने केली आहे. राज्यातील मराठी शाळांमध्ये उर्दू भाषेचा विषय ऐच्छिक ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्य सरकारने जाहीर करताच शिवसेनेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आलेला आहे. हिंदूत्वाचा देशात टीआरपी वाढावा व भाजपच देशद्रोही असल्याचे जनतेसमोर मांडून आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करावी, अशी भूमिका शिवसेना घेत असल्याचे चित्र दिसत असल्याची टीका आक्रोशने केली. 

मराठी शाळांमध्ये इंग्रजी विषय अनिवार्य आहे. कॉन्व्हेन्टमध्ये के.जी.पासून इंग्रजी परकीय भाषेचे शिक्षण दिल्या जाते. मराठी शाळेत मुलांना न शिकविता लहानपणापासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा गरीब पालकही ठेवतो. ज्यांनी भारतात १५० वर्षे राज्य केले, भारतीय लोकांचा अमानुष छळ केला, त्यांच्या इंग्रजी भाषेचा विरोध का केला जात नाही, असा प्रश्न आक्रोश संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक लांजेवार यांनी उपस्थित केला आहे.
उर्दू भाषेचे शाळांमधून ऐच्छिक विषय सुरू झाल्यास बरेच इतर भाषक मुले त्या भाषेचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढे येतील. बहुभाषिक ज्ञान असणे वाईट नाही. उलट त्यामुळे व्यावसायिक, रोजगार उपलब्ध होतो. जागतिकीकरणाच्या काळात भाषेचे राजकारण करणे कुचकटपणाचे लक्षण आहे. विरोधासाठी विरोध करणे हे समाजाच्या हिताचे नसून भाषेचे राजकारण करून समाजात विविध भाषक लोकांमध्ये इर्षां व तेढ निर्माण करणे हे अमानुष आहे. मतांच्या जोगव्यासाठी त्यांच्याकडे जाऊ नये व त्यांचा उपयोग स्वताची पोळी शेकण्याकरिता करू नये, असा सल्लाही डॉ. लांजेवार यांनी दिला आहे.
भारतातून जोपर्यंत जातीचे, धर्माचे, भाषेचे प्रांतिक राजकारण संपणार नाही. निवडून येण्यासाठी या हत्यारांचा जोपर्यंत उपयोग थांबणार नाही. तोपर्यंत या देशाला सुगीचे दिवस येणार नाही.
हे थांबविणे जनतेच्या जनतेच्या हातात असून कोणत्याही मोहात न पडता अशा नेत्यापासून आणि राजकीय पक्षांपासून सावध राहावे, असे त्यांनी म्हटले आहे.