पालघर फेसबुक प्रकरणी निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कारवाई मागे घेण्यास विलंब झाल्यास शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पालघर येथे शाहिन धाडा या तरुणीने फेसबुकवर नकारात्मक प्रतिक्रिया टाकली होती. त्यास तिची मैत्रीण रेणू श्रीनिवासन हिने प्रतिक्रियेला लाइक केले होते. यामुळे पालघरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शहर बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊा दोन्ही तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि या प्रकरणी राज्य शासनाने ठाणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रवींद्र शेणगांवकर व पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे तडकाफडकी निलंबन केले. तर पालघर न्यायालयातील न्यायदंडाधिकारी आर.व्ही.बागडी यांचीही तत्काळ बदली केली.
शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे पोलीस प्रशासन वेठीस धरले जाते आहे. या प्रकारे पोलिसांचे खच्चीकरण केले जात आहे. काही लोकांच्या दाढय़ा कुरवाळून मतांचे राजकारण करण्याकरिता शासनाने ही कृती केली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या माहितीचा तपशील असलेले निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांना देण्यात आले.
निदर्शनावेळी अधिकाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी, बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या. आंदोलनात आमदार क्षीरसागर, विजय देवणे, राजू यादव, दुर्गेश लिंग्रज, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, गजानन भुरके, रणजित आयरेकर यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश होता.