रायगड जिल्हा परिषद नवघर मतदारसंघाच्या चुरशीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सिडकोच्या बोकडवीरा येथील प्रकल्पग्रस्त प्रशिक्षण संकुलात करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे तुकाराम रामचंद्र कडू यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करीत १ हजार १६४ मतांनी विजय मिळविला असून नवघर जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी त्यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे.  नवघर जिल्हा परिषदेच्या जागेसाठी २८ जानेवारी रोजी ७२.३३ टक् के इतके मतदान झालेले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेना-काँग्रेस व मनसेचे उमेदवार तुकाराम कडू यांना ६ हजार ६०,भाजप उमेदवार महेश कडू यांना ४ हजार ८९६ मते तर शेकाप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार प्रकाश म्हात्रे यांना ३ हजार ९५१ मते मिळाली असून सेनेचे उमेदवार तुकाराम कडू विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे.मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
नवघर जिल्हा परिषद मतदारसंघ हा अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनेच जिंकलेला होता.त्यामुळे या निवडणुकीतही शिवसेनेला आपला मतदारसंघ कायम ठेवण्यात यश आलेले आहे.तर नवघर मतदारसंघात भाजपने आश्चर्यकारक दुसरा क्रमांक पटकावला आहे.