महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना अवाच्या सव्वा वीजदेयके येत असल्याच्या निषेधार्थ नवी मुंबई शिवसेनेने वाशी महावितरणच्या कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. आठ दिवसांत यावर तोडगा काढला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारादेखील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणला दिला आहे.
नवी मुंबईत ऐरोली, कोपरखरणे, वाशी, नेरुळ आदी भागांत महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीजग्राहकांना अवास्तव वाढीव वीजदेयके पाठविली जात आहेत. ही वीजदेयके भरण्यासाठी महावितरणचे अधिकारी ग्राहकांवर दबाव टाकत आहे.
वापरापेक्षा अधिक दुप्पट वीज देयक महावितरण पाठवत असून मागील काही महिन्यापासून सरासरीपेक्षा दुप्पट देयके पाठविली जात आहे. वाशी व नेरुळ परिसरात वाढीव देयके दिली जात असल्याचे या वेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता एस.बी.कचरे व एस. डी. सुरवाडे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच महावितरणचे कर्मचारी व अधिकारी देयके भरण्याचे फर्मान सोडत असल्याचा आरोपदेखील या वेळी करण्यात आला. या वेळी कार्यकारी अभियंता एस. डी. कचरे यांनी शिष्टमंडळाला महावितरणकडून जादा बिल हे अनवधानाने गेले असून ते दुरुस्ती करून पुन्हा पाठवू तसेच जोपर्यंत बिले दुरुस्ती करण्यात येणार नाहीत तोपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जाणार नसल्याचे आश्वासन शिष्टमंडळला दिले.