विधानसभेचे तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या इच्छुकांना पदांची बक्षिसी देण्यास शिवसेनेने सुरुवात केली असून ठाणे शहर मतदारसंघातून उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदी बढती देऊन बंडोबांना थंड करण्याची मोहीम सुरू केली आहे. डोंबिवलीतील पक्षाचे नाराज नेते सदा थरवळ यांनाही पक्षाने उपजिल्हाप्रमुखपदी बढती दिली आहे. एकीकडे नाराजांना पदांची बढती देण्याचा सपाटा लावण्यात आला असताना उपनेते अनंत तरे यांना मात्र ‘मातोश्री’ने विधान परिषदेचे गाजर दाखवून बोळवळ केल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भारतीय जनता पक्षासोबत फारकत घेऊन निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेला ठाणे जिल्ह्य़ातील २४ जागांपैकी अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्याची यंदा चांगली संधी आहे. हा जिल्हा सुरुवातीपासून शिवसेनेसाठी बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथील सुरक्षित मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जात होता. त्यामुळे राजन विचारे यांची खासदारपदी निवड होताच या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. ठाणे महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के, माजी महापौर अशोक वैती हे या मतदारसंघातून प्रबळ दावेदार मानले जात होते.
उपनेते अनंत तरे यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र मातोश्रीवरून त्यांना फारसे अनुकूल चित्र नव्हते. एकीकडे ही रस्सीखेच सुरू असताना नारायण राणे यांना वाकुल्या दाखवत नुकतेच शिवसेनेत प्रवेश करते झालेले रवींद्र फाटक यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मिळवत इतर इच्छुकांना धक्का दिला. फाटक यांना उमेदवारी मिळताच संतापलेल्या अनंत तरे यांनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर नरेश म्हस्के हेदेखील रुसून बसले. मात्र या दोघांची नाराजी दूर करण्यात शिवसेना नेत्यांना यश मिळाले असून म्हस्के आणि त्यांच्या समर्थकांवर पदांचा वर्षांव सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या तरे यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांनी पुढाकार घेताच त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेचे आश्वासन दिल्याचा दावा तरे यांच्याकडून केला जात असला तरी हे आश्वासन खरे ठरते का हे येणारा काळच ठरवणार आहे. उमेदवारी नाकारल्याने थेट भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करून दबावतंत्राचा वापर करणारी तरे यांची रणनीती शिवसैनिकांना रुचलेली नाही.
म्हस्के, थरवळांना बढती
दरम्यान, नाराज असलेल्या नरेश म्हस्के यांना ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी भाजप नेते इच्छुक होते. मात्र म्हस्के यांनी उघड बंड केले नाही. त्याचे फळ लागलीच त्यांना देण्यात आले असून त्यांच्याकडे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुखपद सोपविण्यात आले आहे. नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळला तर ठाण्यातील तीन आणि मीरा-भाईंदर परिसरातील एक अशा चार विधानसभा क्षेत्रांचे जिल्हाप्रमुखपद म्हस्के यांना सोपविण्यात आले आहे. याशिवाय म्हस्के यांचे कट्टर समर्थक जगदीश थोरात यांच्याकडे ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे शहरप्रमुखपद सोपविण्यात आले आले आहे. याशिवाय डोंबिवलीत नाराज झालेले सहा थरवळ यांच्याकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुखपद सोपविण्यात आले आहे. या सर्वाना पदांची बक्षिसी देत नाराजांना थोपविण्याची मोहीम शिवसेनेत सुरू झाली आहे.