कल्याण पूर्वेतील नेतिवली ते श्रीमलंगकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या पाच वर्षांपासून पडलेल्या खड्डयांनी चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे चालकाला अवघड झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचे नव्याने काम करून या रस्त्यावरून येजा करणाऱ्या प्रवाशांवरील अरिष्ट संपवावे, अशी मागणी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे  केली आहे.
एक महिन्यात या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाहीतर शिवसेना पध्दतीने या रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठेकेदारांच्या सोयीसाठी या रस्त्यावर टप्प्याने कामे दिली जातात. त्यामुळे प्रत्येक ठेकेदार दरवर्षी या रस्त्यावर मलई कमवितो. पण मूळ समस्या तशीच कायम राहते. ठेकेदारांच्या हितापेक्षा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेचे, चालकांचे हित पाहावे, असेही सेनेनी ठणकावले आहे.