काही जण उमेदवारीच्या अपेक्षेने तर कोणी भगवा झेंडा हाती घेऊन काम करण्यासाठी शिवसेनेत दाखल होत आहेत. वेगवेगळ्या पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी सेनेची वाट पकडली आहे. या माध्यमातून महायुती मजबूत होत असून लोकसभेतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत राज्यात भगवे तुफान निर्माण होईल, असा विश्वास दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला खरा. परंतु विधानसभेच्या तोंडावर रीघ लागलेल्या इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांमुळे कित्येक वर्षांपासून एकनिष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांमधील अस्वस्थतेविषयी मात्र भाष्य करणे टाळले. महाराष्ट्र सदनातील घडामोडींवर प्रसार माध्यमांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यामुळे उद्धव यांनी अवघ्या काही मिनिटांत पत्रकार परिषद आटोपती घेतली. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागांवर सेनेला निवडणूक लढविता येईल काय, तेथील सध्याची राजकीय स्थिती काय या विषयीचा आढावा घेतला.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा आढावा गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या वेळी खा. हेमंत गोडसे, नाशिकचे संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील निवडक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीपूर्वी डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी भगवा ध्वज हाती देऊन त्यांचे स्वागत केले. मिर्लेकर यांनी राज्यभरातून इतर पक्षांतील तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी उद्धव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सेनेत दाखल होत असल्याचे नमूद केले. गावितांच्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी उद्धव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र सदनात सेनेच्या खासदारांनी कर्मचाऱ्यांचा रोजा मोडल्यावरून गदारोळ उडाला आहे. या एकाच विषयावर प्रश्न विचारले जाऊ लागल्याने उद्धव यांनी प्रारंभी त्याबाबत स्पष्टीकरण देत शिवसेनेची भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी विषयांतर करण्याचा प्रयत्न केला. दररोज शिवसेनेत अनेक पक्षांतील पदाधिकारी दाखल होत असल्याचे सांगत महायुती मजबूत होत असल्याचे नमूद केले. पण, निवडणुकीच्या तोंडावर केवळ तिकिटासाठी पक्षात दाखल होणाऱ्या अशा पदाधिकाऱ्यांमुळे कित्येक वर्षांपासून एकनिष्ठ  राहिलेल्या शिवसैनिकांवर अन्याय होईल की नाही ही बाब स्पष्ट केली नाही. वारंवार महाराष्ट्र सदनाबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागल्याने ठाकरे यांनी इतर प्रश्न टाळून थेट निघून जाणे पसंत केले.

नंदुरबारमध्ये तीन जागांवर आता गावित कुटुंबीय?
माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करतानाच आपण शहादा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. गावित कुटुंबीयांनी नंदुरबार जिल्ह्यात मोठे काम केले आहे. यामुळे जनता आम्हाला निवडून देते असे त्यांनी नमूद केले. मंत्रालयात १७ वर्षे आपण कक्ष अधिकारी म्हणून काम केले. तसेच डॉ. गावित यांचे स्वीय साहाय्यक म्हणूनही काम केले. आदिवासीबहुल भागातील प्रश्न आपणास माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघांतून गावित कुटुंबातील सदस्य रिंगणात राहणार असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेल्या डॉ. विजयकुमार गावितांचा नंदुरबार हा मतदारसंघ आहे. ते तेथून रिंगणात उतरतील. नवापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांचे बंधू शरद गावित करत आहेत. आता राजेंद्र गावित यांनी शहादा मतदारसंघाची निवड केली आहे. यामुळे तीन मतदारसंघांत गावित कुटुंबीय रिंगणात राहणार असले तरी उर्वरित दोन बंधू कोणत्या पक्षातून उमेदवारी करणार हे मात्र अस्पष्ट आहे.

सर्व जागांचा आढावा
महायुतीचा घटक असलेल्या भाजपकडून स्वबळाची हाळी दिली जात असल्याने उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील काहीशी त्याच पद्धतीने चाचपणी करण्यास प्राधान्य दिले. काही दिवसांपूर्वी भाजपच्या उच्चस्तरीय समितीने नाशिक विभागाचा आढावा घेतला होता. त्यानंतर लगोलग शिवसेनेने आढावा घेऊन विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे अधोरेखित केले. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांकडून निवडणूक एकत्रितपणे लढविली जाईल, असे सांगितले जात असले तरी उभय पक्षातील काही घटक स्वबळाचा नारा देत आहेत. यामुळे कोणताही धोका न पत्करता सर्व जागांचा आढावा घेण्याचे धोरण दोन्ही पक्षांनी ठेवले आहे. त्याची प्रचीती शिवसेनेच्या आढावा बैठकीत आली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतील सर्व विधानसभा मतदारसंघांतील सध्याची राजकीय स्थिती काय आहे, त्या ठिकाणी शिवसेनेची स्थिती काय, विद्यमान आमदार कोण, सामाजिक स्थिती कशी आहे, इच्छुक कोण कोण आहेत आदी तपशील उद्धव यांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतला. महायुतीत जागा वाटपावरून अधिक ताणले गेल्यास सर्व जागांवर उमेदवार देता येईल का, याची चाचपणी उद्धव यांनी केली.