मतदारसंघाची रचना आणि सातत्याने ठेवलेला जनसंपर्क या बळावर घोलप घराण्याने सलग सहाव्यांदा देवळाली मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकविण्यात यश मिळविले. वडिलांच्या पुण्याईवर योगेश घोलप यांनी सर्व विरोधकांना चारीमुंडय़ा चीत करत नाशिक शहरात उठलेल्या मोदी नावाच्या वावटळीला आपल्या मतदारसंघाकडे फिरकूही दिले नाही.
देवळाली-नाशिकरोड मतदारसंघ जणू काही बबन घोलप यांच्या मालकीचाच झाला आहे की काय, असे वाटावे इतपत त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी याच मतदारसंघाने शिवसेनेला घोलप यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्रातील पहिला आमदार दिला. त्यानंतर घोलप यांनी मतदारसंघावर अशी काही मोहिनी घातली की, समोर कोणताही विरोधक असो, कोणतीही लाट असो त्यांचा विजय ठरलेलाच. ज्ञात स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याप्रकरणी अलीकडेच न्यायालयाने बबन घोलप यांच्या विरोधात निकाल दिल्याने त्यांना निवडणूक लढविता आली नाही. शिवसेनेने मग घोलप यांचे पुत्र योगेश यांना उमेदवारी दिली. मंचावर उमेदवार म्हणून योगेश दिसत असले तरी पडद्यामागे बबन घोलप हेच मतदारांसाठी उमेदवार होते. राष्ट्रवादीने घोलप यांना घेरण्यासाठी या वेळी वेगळेच जाळे विणले होते. घोलप यांना सातत्याने ज्या गिरणारे भागातून अधिक मताधिक्य मिळते, त्याच भागातील उमेदवार उभा केला. त्यामुळे काही राष्ट्रवादी समर्थकांना आता घोलप यांचे बारा वाजणार असे वाटू लागले होते. परंतु मतदारसंघातील एकेका गावातील, एकेका मतदाराची खडान्खडा माहिती असलेल्या बबन घोलप यांनी आखलेल्या प्रचार तंत्रापुढे राष्ट्रवादीचा डाव फसला. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून प्रचारात फारसे सहकार्य न मिळताही घोलप यांनी आपल्या मुलास २८ हजार ३७१ इतक्या मताधिक्याने सहजपणे निवडून आणले.
सातत्याने मतदारसंघ ताब्यात ठेवूनही घोलप यांनी कोणताच बडा प्रकल्प किंवा नजरेत भरेल असे एकही काम केलेले नाही. परंतु जनतेची लहान-सहान कामे करून देण्यास ते सदैव तत्पर. गावागावांमध्ये आमदार निधीतून समाजमंदिर, कार्यालय बांधण्यात त्यांनी आघाडी घेतलेली आहे. व्यक्तिगतरीत्याही ते मदतीसाठी सदैव तयार राहत असल्याने जनतेमध्ये त्यांची वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे. शिवाय ग्रामीण भागातील जातीय समिकरणाचाही त्यांना फायदा होत आला आहे. आमदारास भेटण्यासाठी कोणालाही आडकाठी नसल्याने कोणीही थेट घोलप यांच्याशी संपर्क साधू शकतो. या कारणांमुळे त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा बनला आहे. त्मुळे त्यांची मतदारसंघावरील पकड कायम राहण्यास मदतच झाली आहे. मागील निवडणुकीत नाशिक शहरातील तिघा मतदारसंघांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जादू चालली. परंतु अगदीच लगत असलेल्या देवळालीत घोलप यांच्यापुढे ही जादू फिकी पडली. तसेच या वेळी घडले. मोदी लाटेमुळे नाशिकमधील तिघा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले असताना देवळालीत घोलप यांनी आपल्या मुलास निवडून आणण्याची किमया केली.