आगामी दुर्ग साहित्यसंमेलन पुरंदर किंवा सिंहगडावर, महाराष्ट्रातील दुर्ग युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समाविष्ट व्हावे या दोन ठरावांसह अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि मेघडंबरी उभारण्यात यावी या मुख्य मागणीने गेले तीन दिवस सुरू असलेल्या चतुर्थ दुर्ग साहित्यसंमेलनाचे सूप वाजले. तर सध्याचे कास-ठोसेघरचे बदलते स्वरूप दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेते मििलद गुणाजी यांनी व्यक्त केली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले सज्जनगड येथे गोनिदा दुर्गप्रेमी मंडळ, रानवाटा आणि संलग्न संस्था, एलआयसी-एमटीडीसी यांच्या मुख्य सहकार्याने चतुर्थ दुर्ग साहित्यसंमेलनाचे आयोजन केले होते. गेले तीन दिवस दुर्गप्रेमींचा मेळावा यानिमित्ताने भरला आणि सारा परिसर उत्साहाने शिवरायांच्या, समर्थ रामदासांच्या जयजयकाराने भारावून गेला होता.
संमेलनाचा समारोप करताना मििलद गुणाजी यांनी सातारा जिल्हा पर्यटनासाठी अधिक उत्तम असल्याचे सांगतानाच येथील पर्यटनस्थळांची स्वच्छता हा आता चिंतेचा विषय बनू लागला आहे, त्यामुळे त्याबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अशा दुर्ग साहित्यसंमेलनाद्वारे ती होण्यास मदत मिळेल, असा आशावाद व्यक्त करत त्यांनी संयोजकांनाही धन्यवाद दिले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आशीर्वादपर मनोगतात, नेहमीच्या मिस्कीलीमध्ये ‘वादाविना पार पडलेले संमेलन’ असे सांगत सर्वाचे आभार मानले आणि पुढच्या संमेलनात यापेक्षा दुप्पट-तिप्पट संख्येने सहभागी व्हा, मी तुमची वाट पाहतोय असे सांगितले. त्याचबरोबर संमेलनांची दहशत बाजूला ठेवून सर्वप्रकारच्या साहित्यिकांनी सहभागी व्हावे, असे निमंत्रण देत जेव्हा हृदय भरून येते तेव्हा तोंडून शब्द बाहेर पडत नाहीत अशा शेक्सपीअरच्या वाक्याने सातारकरांचा निरोप घेतला.
संमेलनाध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी संमेलनाचे सूप वाजले असे जाहीर करत, कर्माचे डोळे ज्ञान हेच असून ते निर्दोष असावे, असा सल्ला दिला. या संमेलनात दुर्ग, शिवराय, स्थापत्य, पर्यावरण आणि वनस्पती या सर्व विचारांचा ऊहापोह झाला आणि चर्चा-विचार समृद्धता, मनोरंजनाबरोबर थरारकता आणि प्रबोधन याचा अनुभवही या संमेलनाने दुर्गप्रेमींना दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले. डॉ. वीणा देव आणि डॉ. विजय देव यांनी डॉ. संदीप श्रोत्री यांच्यासह दुर्ग साहित्यसंमेलन समितीच्या सर्व सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत धन्यवाद दिले. याप्रसंगी चित्रकला स्पर्धा आणि प्रश्नमंजूषा स्पध्रेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर दुर्गप्रेमी प्रतिनिधी देवेश अभ्यंकर, रवींद्र अभ्यंकर, प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी संमेलनाच्या संयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच या वेळी गेल्या तीन संमेलनाचे संयोजन करणा-या संयोजकांचा, सूत्रसंचालिका स्नेहल दामले, वैदेही कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. समारोपापूर्वी गोनिदा लिखित ‘वाघरू’ कादंबरीचे डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव, रुचिर कुलकर्णी यांनी अभिवाचन केले.