काही वर्षांपासून धोकादायक अवस्थेत असलेली आणि तेथील मासे विक्रेत्यांच्या पर्यायी जागेमुळे पुनर्विकास रखडलेली छत्रपती शिवाजी मंडई अखेर जमीनदोस्त होणार आहे. महात्मा फुले मंडईशेजारील (क्रॉफर्ड मार्केट) ही मंडई पाडण्यासाठी महापालिकेला दोन कोटी ६० लाख रुपये खर्च येणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महात्मा फुले मंडईच्या (क्रॉफर्ड मार्केट) बाजूला पलटण रोडवर पालिकेची शिवाजी मंडई ही चार मजल्यांची इमारत आहे. ही इमारत मोडकळीस आल्यानंतर पालिकेने ऑक्टोबर २०१३ मध्ये ती रिकामी केली होती. इमारतीमधील मालमत्ता, जकात, आरोग्य, लायसन, घनकचरा व्यवस्थापन विभागाची कार्यालये मुंबईच्या विविध विभागांमध्ये हलविण्यात आली आहेत. इमारत पाडून तिचा पुनर्वकिास केला जाणार आहे. इमारतीच्या पाडकामासाठी दिले जाणारे कंत्राट पदरात पाडून घेण्यासाठी कंत्राटदाराने १२ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

रेकॉर्ड विभाग चंदनवाडीत?
इमारत धोकादायक जाहीर झाल्यानंतरही मंडईच्या दुसऱ्या मजल्यावर मुंबई शहरातील लाखो इमारतींचा मालमत्ता विभागाचा रेकॉर्ड ठेवण्यात आला आहे. हा रेकॉर्ड आणण्यासाठी इमारतीत जावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इमारत पाडली जाणार असल्याने रेकॉर्ड विभाग आता चंदनवाडी महापालिका शाळेत हलविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मासे विक्रेते क्रॉफर्ड मार्केटमध्ये
शिवाजी मंडईच्या तळमजल्यावर सुमारे २०० मासळी विक्रेते असून त्यांना दुसऱ्या जागी हलविण्यावरून तिढा निर्माण झाला होता. इमारतीचा पुनर्विकास होईपर्यंत आधी बीपीटीच्या जागेवर नंतर मुलुंडमध्ये पर्यायी जागा देण्याचा निर्णय विक्रेत्यांना मान्य नव्हता. आता या विक्रेत्यांना क्रॉफर्ड मार्केटमध्येच मासळी-मटण विभागाच्या मोकळ्या जागेत हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. विक्रेत्यांनीही हा निर्णय मान्य केल्याचे कळते.