चिखली शहरातील पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक झाली असून स्वच्छ पाणीपुरवठा करा, अन्यथा नगर परिषद अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा येथील शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश अंजलकर यांनी दिला आहे.
सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या चिखली शहराची व्याप्ती वाढतच आहे. शहरातील वॉर्डांची संख्या २४ आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चिखली येथील पाणी समस्या सोडवण्यास प्रशासनाला अपयश आलेले आहे. किमान तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी देऊनही तिसऱ्या दिवशी नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. स्वच्छ पाणी मिळणे दूरच, पण गढूळ, हिरव्या, पिवळ्या रंगाचे पाणी शहरातील नागरिकांना पुरवले जात आहे. पेनटाकळी धरणात पाणी भरपूर प्रमाणात आहे. तरीसुध्दा चिखलीकरांना नियमितपणे पाणी मिळेनासे झालेले आहे.
चिखली शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाच साठवण टाक्या आहेत. विश्रामगृहासमोरीत बगीचा टाकीची क्षमता चार लाख लिटर आहे. या टाकीवरून अठरा भागामध्ये दर आठव्या दिवशी पाणी सोडले जाते. शुध्दीकरण केंद्राजवळील मोठय़ा टाकीची पाणी साठवण क्षमता बारा लाख लिटर आहे. या टाकीतून ४६ भागांमध्ये १५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो.
रोहिदास नगर येथील पाण्याच्या टाकीची साठवणूक क्षमता ५ लाख ३५ हजार लिटर आहे. यातून १२ भागातील नागरिकांना पंधरा दिवसआड पाणीपुरवठा होतो. पुंडलिक नगर येथील पाण्याच्या टाकीची साठवणूक क्षमता तीन लाख ५० हजार लिटर आहे.
येथील ४८ भागांना अकरा दिवसाआड पाणी मिळते, तर जाफ्राबाद रोडवरील पाचव्या पाण्याच्या टाकीची पाणी साठवण क्षमता ३ लाख ५० हजार लिटर आहे. यातील ३६ भागातील लोकांना १० दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तरीही दहाव्या दिवशी व ११ व्या दिवशी पाणी पुरवठा अनियमितपणे केला जातो.
हा सर्व वितरण प्रणालीचा दोष असून नागरिकांकडून वर्षभराचा कर वसूल करणाऱ्या प्रशासनाने येत्या ८ दिवसात चिखली परिसरातील नागरिकांना समान प्रमाणात व वेळेच्या वेळी पाणी पुरवठा नियमितपणे न केल्यास नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून खुर्चीवर बसू न देण्याचा इशारा चिखली शिवसेना शहर प्रमुख निलेश अंजनकर यांनी दिला आहे.