शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासह त्यांच्या स्मरणार्थ कलादालन व उद्यानाची उभारणी, अशा सर्व विषयांवर लवकरच सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी दिली. मंगळवारी आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहताना सदस्यांनी भाषणातून केलेल्या वेगवेगळ्या सूचना लक्षात घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत महापौरांनी दिले. महापालिका सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली.
बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ काय करता येऊ शकेल, यासंदर्भात विविध स्वरूपाच्या सूचना शिवसेनेसह इतर काही पक्षांकडून केल्या जात आहेत. सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा त्याचे प्रत्यंतर आले. प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भावना व्यक्त करताना बहुतांश सदस्यांनी सूचना मांडल्या. शहरात बाळासाहेबांचे स्मारक व्हावे, असे मत माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांनी व्यक्त केले. तर, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास शिवसेनाप्रमुखांचे नांव देण्याचे सुचविले. मनसेचे गटनेते शशिकांत जाधव यांनी बाळासाहेबांच्या नांवाने कलादालन स्थापन करण्याची मागणी केली तर नगरसेवक अशोक सातभाई यांनी नाशिकरोड भागात उद्यान निर्मिती करून त्यास बाळासाहेबांचे नांव देण्याची विनंती केली. यावेळी महामार्गावरील विल्होळी येथील मिनाताई ठाकरे यांच्या नांवाने असलेल्या कमानीचा विषय चर्चेत आला. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात ही कमान राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने काढून टाकली. महापालिकेने संबंधित विभागास ही कमान पुन्हा उभारण्याचे निर्देश देण्याची मागणी सदस्यांनी केली. स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी पालिका सभागृहात शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली. महापौरांनी सभागृहात शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र लावण्यास मान्यता दिली.