कामोठे टोलनाक्यावर मोटारचालकाने तक्रारवही मागितल्यामुळे नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणाऱ्या मनोज गोयल यांना बाऊंसरकरवी मारहाण करण्यात आली. या भाईगिरीविरोधात शिवसेनेने दंड थोपाटले आहेत. सरकारमध्ये असूनही या अन्यायकारक टोलवसुलीच्या विरोधात सोमवारी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निवेदन देण्यासाठी कामोठे टोलनाक्यावर एकच गर्दी केली. या शंभराच्या जमावात ३० महिला कार्यकर्त्यां होत्या.
गोयल यांनी तक्रारवही मागितली म्हणून मारहाण करणाऱ्या बाऊंसरवर सायन-पनवेल टोलवेज कंपनीने कारवाई करावी व टोलवसुली करताना सक्ती नको, नम्रता मुखात घेऊन काम करण्याचे प्रशिक्षण द्या, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करू असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले.
‘लोकसत्ता’ने या घटनेची बातमी शुक्रवारी प्रसिद्ध केल्यानंतर रायगडचे संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांनी जिल्हाप्रमुख पाटील यांना या प्रकरणी लक्ष देण्याचे सुचविले होते. कामोठे व खारघर टोलनाक्यावर वसुली करण्यासाठी बाऊंसरचा आधार घेत मोटारचालकांवर दहशत माजवून येथे टोलवसुली केली जाते. फिनिक्स सिक्युरिटी या कंपनीला सुरक्षारक्षक पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. फिनिक्स कंपनीचे मालक एका सरकारी अधिकाऱ्याचे पुत्र असल्याने मारहाण झाल्यावर खारघर किंवा कळंबोली या दोनही पोलीस ठाण्यांत बाऊंसरविरोधात थेट गुन्हा दाखल होत नाही.
मोटारचालकांना मारहाण झाल्यानंतर पीडिताची तेथे बोळवण करण्यात येते. बाऊंसर किंवा सुरक्षा कंपनीवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात येते. शिवसेनेच्या सोमवारच्या आंदोलनात येथील दादागिरी बंद करावी अन्यथा पाच दिवसांत टोलनाका फोडू असा इशारा शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील यांनी दिला. या वेळी रामदास पाटील, नगरसेवक प्रथमेश सोमण व इतर कार्यकर्ते येथे उपस्थित होते. या वेळी शिवसेनेने एसपीटीपीएल कंपनीला त्याबाबतचे निवेदन दिले. कंपनीच्या वतीने असे यापुढे होणार नाही अशी दिलगिरी येथे व्यक्त करण्यात आली. जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी पनवेलकरांसाठी रस्त्यावर उतरायची ही पहिलीच वेळ होती.