टिमकीतील एक दुकानदार व तुळशीबागेतील एका बेरोजगाराने गांधीसागरात आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने तेथे बघ्यांची गर्दी झाली होती.
गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास रमण विज्ञान केंद्रासमोरील गांधीसागरात एक मृतदेह तरंगताना दिसला. जगदीश खरे याच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृत इसमाच्या खिशात वाहन परवाना व निवडणूक आयोगाचे ओळखपत्र सापडले. त्यावरून संतोष गुणवंत बोरकर (रा. नेताजी बोस शाळेजवळ, पाचपावली) याचा मृतदेह असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचे वडील व लहान भाऊ घटनास्थळी आले. त्यांनी हा मृतदेह संतोषचा असल्याचे ओळखले. संतोषचे टिमकीत केस कर्तनालय असून तो पत्नीसह पाचपावलीतील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेजवळ रहात होता. दहा वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते, मात्र त्याला अपत्य नव्हते. त्याला दारूचे व्यसन होते, असे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
पोलीस ठाण्यात येऊन कार्यवाही करीत असतानाच समोरच हातगाडीवर चहा विकणारी महिला तेथे आली आणि पती बेपत्ता असल्याची सूचना तिने पोलिसांना दिली. तिच्याकडून माहिती घेत असतानाच चाचा नेहरू बालभवनासमोर गांधीसागरात आणखी एक मृतदेह पाण्यावर तरंगताना असल्याची सूचना पोलिसांना मिळाली. जगदीश खरे याच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. अजय मनोहर ठाकरे (रा. रामाजीची वाडी तुळशीबाग) याचा मृतदेह असल्याचे त्याच्या पत्नीने ओळखले. अजयला तेरा वर्षांची मुलगी व अकरा वर्षांचा मुलगा आहे. अजय काहीच कामधंदा करीत नव्हता. सतत दारू पिऊन तो अश्लील शिवीगाळ व पत्नीला मारहाण करीत होता. त्यापायी त्याचे कुटुंब त्रस्त्र झाले होते. मंगळवारी सायंकाळी तो घरी दारू पिऊन आला. त्याचे घरी कडाक्याचे भांडण झाले. तो घराबाहेर पडला. तेव्हापासून तो बेपत्ता होता, असे त्याच्या पत्नीने सांगितले.   

‘आत्महत्यांचे केंद्र’
गांधीसागराची ‘आत्महत्यांचे केंद्र’ अशी नवी ओळख झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून सौंदर्यीकरण सोडाच आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाकरवी कुठलेच प्रयत्न होत नाहीत. गांधीसागरावर जगदीश खरे व त्याच्या पत्नीच्या प्रयत्नाने आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्याचप्रमाणे सुमारे दोन हजार मृतदेह त्यांनी काढले आहेत.