उरण तालुक्यात सध्या सुट्टय़ा पैशांची मोठय़ा प्रमाणात टंचाई भासत आहे. यावर उपाय म्हणून विक्रेत्यांनी एक व दोन रुपयांच्या सुट्टय़ा पैशांच्या बदल्यात चॉकलेट देण्यास सुरू केले आहे. परंतु आता एक व दोन रुपयांच्या चॉकलेटांची जागा आता पाच रुपयांनीही घेतल्याने विक्रेत्यांकडून पाच रुपयांचे चॉकलेट सुट्टे पैसे म्हणून दिले जात असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
एखाद्या दुकानात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी जाताना तसेच प्रवासाला बाहेर पडताना सुट्टे पैसे असणे आवश्यक आहे. अन्यथा बसचा वाहक, रिक्षाचालक यांच्यात व प्रवाशांमध्ये हमखास बाचाबाची होते, हे चित्र तालुक्यात हमखास आढळत आहे.
दुकानदारांनी या सुट्टय़ा पैशांच्या टंचाईवर शक्कल लढवून एक मार्गच काढला आहे. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर एक किंवा दोन रुपये सुट्टे द्यावयाचे असल्यास दुकानातील त्या किमतीचे चॉकलेट ग्राहकांच्या हातावर टेकविले जातात. यात आता ग्राहकांचीही पसंती बदललेली आहे. ग्राहक दुकानदारांकडून आपल्या पसंतीचे चॉकलेट मागून घेऊ लागले आहेत. त्यामुळे सुट्टे नाहीत म्हणून तो तक्रार करीत नसला तरी सुट्टय़ा पैशांऐवजी चॉकलेट घेणे अनेकांना पसंत नाही.
आता तर पाच रुपयांचे सुट्टे पैसेही चॉकलेटमध्ये परावर्तित केल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे; तर दुसरीकडे सध्या बँकेने पैसे काढण्यासाठी ए.टी.एम.ची सोय केल्याने ए.टी.एम.मधून केवळ शंभर, पाचशे किंवा हजार रुपयांच्याच नोटा मिळत असल्याने याच नोटा घेऊन दोन-पाच रुपयांच्या वस्तू घेण्यासाठी ग्राहक दुकानात येत असल्याने सुट्टय़ा पैशांची टंचाई भासू लागली आहे, अशी खंत औषध विक्रेते मनोज ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. दुकानात सुट्टे पैसे ठेवण्यासाठी अधिक पैसे देऊन चिल्लर घ्यावी लागत आहे.
याचाही फटका आता व्यावसायिकांना बसू लागला आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहक तर दुसरीकडे व्यावसायिकही या सुट्टय़ा पैशांमुळे त्रस्त झाला आहे. मात्र सध्या दुकानदारांनी पाच रुपयांचे सुट्टे म्हणून चॉकलेट दिले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.