औषध पुरवठादाराची बाकी असलेली रक्कम शासनाने न दिल्याने विमा कामगार रुग्णालयात वाढ खुंटलेल्या लहान मुलांना देण्यात येणाऱ्या ‘ग्रोथ हार्मोन्स इन्जेक्शन’चा गेल्या एक महिन्यापासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून लाभार्थी मुले वंचित राहात आहेत.
वयानुरुप उंची कमी असलेल्या मुलांना ‘ग्रोथ हार्मोन्स इन्जेक्शन’ दिले जाते. जवळपास १३ हजार रुपये किंमत असलेले व काही मुलांना प्रत्येक महिन्याला आवश्यक असलेले हे इन्जेक्शन अत्यंत गरीब, कामगार आणि मध्यमवर्गीयही आपल्या पाल्यांना आर्थिक टंचाईमुळे देऊ शकत नाहीत. कामगार वर्ग तर विमा रुग्णालयातच धाव घेतात. येथे कामगारांच्या मुलांना हे इन्जेक्शन निशुल्क उपलब्ध करून दिले जाते. परंतु गेल्या एक महिन्यापासून विमा रुग्णालयात या इन्जेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने पुरवठादार कंपनीची रक्कम दिली नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
वयोमानानुसार मुलांची उंची वाढत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कामगार पालक विमा रुग्णालयात धाव घेतात. विमा रुग्णालयातर्फे त्या मुलाला तपासणीसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये पाठवले जाते. येथे त्या मुलाची तपासणी व इतर चाचण्या केल्या जातात. तपासणी व इतर चाचण्यावरून त्या मुलाला किती इन्जेक्शनची आवश्यकता आहे, याची माहिती विमा रुग्णालयाला दिली जाते. त्यानुसार विमा रुग्णालय या रुग्णाला इन्जेक्शनचा पुरवठा करतो. काही मुलाला एका महिन्याला एक तर काही मुलांना दोन महिन्यातून एकदा एका इन्जेक्शनची गरज असते. एक इन्जेक्शन एक आठवडा घ्यावे लागते. मधुमेही जसे घेतात तसे हे इन्जेक्शन रुग्णाला घ्यावे लागते. नागपूर शहरात जवळपास अशी पंचेवीस मुले असून त्यातील ७ मुले एकटय़ा विमा रुग्णालयात येऊन उपचार घेतात. या मुलांना इन्जेक्शन नसल्याच्या कारणावरून गेल्या एक महिन्यापासून परत पाठवले जात आहे.
यासंदर्भात विमा कामगार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक लवंगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रोथ हार्मोन्स इन्जेक्शनचा रुग्णालयात तुटवटा आहे. विमा रुग्णालयाला वर्षांचे किती इन्जेक्शन लागतात, त्यानुसार शासनाचा आरोग्य विभाग विशिष्ट कंपनीच्या पुरवठादाराशी करार करतो. परंतु शासनाने पुरवठादाराची रक्कम न दिल्याने त्याने या इन्जेक्शनचा पुरवठा करणे बंद केले आहे. याची माहिती आम्ही शासनाला पाठवली आहे. वितरकाने मात्र या इन्जेक्शनचा लवकरच पुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे इन्जेक्शन लवकरच उपलब्ध होईल, असेही डॉ. लवंगे यांनी सांगितले. कंपनीची किती रक्कम थकित आहे, हे सांगण्यास मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.
लवकरच पुरवठा करू
ग्रोथ हामोन्स इन्जेक्शनचा विमा रुग्णालयाला लवकरच पुरवठा केला जाणार आहे. शासनाने थकित रक्कम दिली नव्हती. त्यामुळे पुरवठा करणे थांबवले होते. शासनाचे आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात याबाबत चर्चा झाली आहे. शासनाने रक्कम दिली नसली तरी सामाजिक बाब म्हणून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे इन्जेक्शन उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लवकरच विमा रुग्णालयाला या इन्जेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे.
प्रशांत खुबाळकर, वैद्यकीय प्रतिनिधी व पुरवठादार