नागपूर विभागात दररोज तिघांना सर्पदंश होत असताना मोठी शासकीय रुग्णालये सोडली तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत या लसीच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचारच मिळत नसल्याने मृत्यूपंथाला जावे लागत आहे. दुसरीकडे शासकीय रुग्णालयात सर्पदंशावरील लस उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे.
नागपूर विभागात सहा जिल्ह्य़ांत १ जानेवारी ते ३० जून २०१४ या सहा महिन्याच्या कालावधीत ६८१ जणांना सर्पदंश झाला. सर्पदंशाची संख्या मोठी असली तरी त्या तुलनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. या सहा महिन्यात सर्पदंशाने फक्त सात व्यक्तींचा मृत्यू झाला. दंश करणारे सर्वच साप हे विषारी नसतात. तसेच जनजागृती आणि वेळेवर औषधोपचार मिळत असल्याने मृत्युमुखी पडत असणाऱ्यांचे प्रमाण फार कमी असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कालवधीत सर्वाधिक २६८ सर्पदंश वर्धा जिल्ह्य़ात झाले असून त्यामध्ये फक्त एकाचा मृत्यू झाला. यानंतर नागपूर जिल्ह्य़ाचा समावेश होतो. नागपूर जिल्ह्य़ात गेल्या सहा महिन्यात १३८ व्यक्तींना सर्पदंश झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्य़ात ८८ व्यक्तींना सर्पदंश झाला तर एकाचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्य़ात ७७ व्यक्तींचा सर्पदंश झाला तर दोघांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्य़ात २९ व्यक्तींना सर्पदंश झाला. त्यात एकाला आपले प्राण गमवावे लागले. चंद्रपूर जिल्ह्य़ात ८१ व्यक्तींना सर्पदंश झाला. त्यात एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातून प्राप्त झाली.
भारतात दरवर्षी २ लाख ५० हजार लोकांना सर्पदंश होतो. त्यातील ३५ ते ५० हजार नागरिकांचा मृत्यू होतो. म्हणजेच सर्पदंशाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण हे २ ते ३ टक्के एवढे आहे. वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने हे मृत्यू होतात.
आजही समाजामध्ये गैरसमज, अंधश्रद्धा रुढ आहेत. परंतु जनजागृतीमुळे त्या दूर होताना दिसत आहे. जिथे साप असण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी शक्यतोवर खाली झोपू नये. रात्री घराबाहेर पडताच बूट घालून निघावे. हातात एक काठी ठेवावी. चालताना काठीने जमिनीवर ठक-ठक करीत चालावे.
धरणीचे कंपन सापाला कळतात. त्यामुळे तोच वाटेतून दूर होतो. आश्रमशाळांमध्ये सर्पदंशाने विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशीच काळजी वसतिगृहात राहताना घ्यायला हवी. गावठी व मंत्रोपचार न करता सर्पदंश झाल्यावर त्वरित जवळच्या रुग्णालयात जावे, असा सल्ला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिला.
ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लस उपलब्ध नसेल तर त्या केंद्रातील अधिकारी त्या रुग्णाला जिल्हास्तरीय रुग्णालयात पाठवतात. लस उपलब्ध असल्याने व ती वेळीच मिळत असल्याने सर्पदंश झालेल्या रुग्णांच्या मृत्युसंख्येत कमालीची घट झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नाही, असा आरोप करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. सर्पदंश झाल्यानंतर किमान बारा तासाच्या आत रुग्णाने रुग्णालयात येणे आवश्यक आहे. बरेच लोक उशीर लावतात. त्यामुळे ती लसही काम करीत नाही. मग अशावेळी लस उपलब्ध नसल्याचे किंवा रुग्णालयातील डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करीत असल्याचेही डॉ. जयस्वाल यांनी सांगितले.  
सापाच्या अनेक प्रजाती असल्या तरी त्यातील केवळ बोटावर मोजण्याएवढय़ाच प्रजाती विषारी आहेत. महाराष्ट्रात प्रकर्षांने आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रजाती अवघ्या चार आहेत. त्यात नाग (कोब्रा), मण्यार (कॉमन क्रेट), घोणस (रस्सेल वायपर) आणि फुरसे (सॉ स्केल्ड) यांचा समावेश होतो.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ात फुरसे अभावानेच आढळतात. त्यांची संख्या कोकणात जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक साप विषारी असतो, असे समजून ‘दिसला साप की मार’ ही प्रवृत्ती सोडायला हवी.

लस उपलब्ध
महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लसी उपलब्ध नसल्या तरी मेडिकमध्ये मोठय़ा प्रमाणात सर्पदंशावरील लसी उपलब्ध आहेत. डॉ. अपूर्व पावडे अधीक्षक असताना त्यांनी शासनाकडून मोठय़ा संख्येत लसी मागवल्या होत्या. त्यामुळे मेडिकलमध्ये तुटवडा नाही. तसेच प्रत्येक साप हा विषारी नसतो, त्यामुळे लक्षणे पाहूनच ही लस द्यावी लागते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला लस उपलब्ध झाली नाही आणि त्याचा मृत्यू झाला, असे मेडिकलमध्ये घडले नाही. औषधाच्या दुकानातसुद्धा या लसी उपलब्ध आहेत. सर्पदंश झालेल्या व्यक्तीने त्वरित मेडिकलमध्ये आल्यास त्याचे प्राण वाचू शकतात.
डॉ. मुरारी सिंग (जनसंपर्क अधिकारी, मेडिकल)