वाचकांच्या नजरेतून केसभरही चूक निसटून जात नसल्याचे भान ठेवत साहित्यिकांनी जबाबदारीने लेखन करून आपल्या साहित्यकृतींशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असे मत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
येथील मराठा समाजसेवा मंडळाने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी प्रशालेच्या सभागृहात आयोजिलेल्या बौध्दिक व्याख्यानमालेत विचारपुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘माझ्या कादंब-या-पानिपत व्हाया झाडाझडती’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मंडळाचे अध्यक्ष, माजी महापौर मनोहर सपाटे हे अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. अनिल बारबोले यांनी प्रास्ताविक करून वक्तयांचा परिचय करून दिला.
आपण आयुष्याच्या वाटचालीत शब्दांच्या फडात रमलो. लोककलेतून, लोकगीतांतून साहित्याची ऊर्जा मिळत गेली. ‘जो न देखे रवी, वह देखे कवी’ या उक्तीनुसार साहित्याकडे पाहत आल्याचे सांगताना पाटील यांनी आपल्या साहित्य वाटचालीचा पट उलगडून दाखविला. साहित्यिकांनी दडलेला इतिहास समाजासमोर आणण्याची व त्यावर निष्पक्षपातीपणे प्रकाश टाकण्याची गरज आहे. पानिपत येथे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समक्ष भेट दिली, तेव्हा त्यांच्या नेत्रांतून जलधारा बरसल्या. कारण पानिपतावर महाराष्ट्रातील शूर मराठा वीरांचे रक्त सांडले होते. इतिहासात दडलेले तत्त्वज्ञान घेऊन आपण समाजापुढे यावयाचे असते. छत्रपती शिवाजीमहाराज व संभाजीमहाराज हे स्वत:साठी लढले नाहीत तर समाजासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी लढले. शिवरायांनी केवळ लढायाच केल्या नाहीत तर त्याचे शास्त्र शिकविले. बंगळुरूचा आधुनिक पाया शहाजीराजांनी घातला. मराठे लुटारू होते, हे काही इतिहासकारांनी निर्माण केलेले चित्र चुकीचे आहे. मराठे हे ख-या अर्थाने शूर होते, असे पाटील यांनी नमूद केले.
‘संभाजी’ ही कादंबरी आपल्या आयुष्यातीस गोड आघात असल्याचे सांगताना ते म्हणाले, संभाजीराजांनी आपल्या जीवनात एकूण १०५ लढाया केल्या व त्यापैकी १०४ लढाया जिंकल्या. छत्रपती शिवरायांनंतर संभाजीराजांनी महाराष्ट्राचे रक्षण केले. धरण बांधण्याची कल्पना सर्वप्रथम संभाजीराजांनी आखली. संसारी व संस्कारी पुरूष म्हणून संभाजीराजांची ख्याती होती. त्यादृष्टीने त्यांची योग्यता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिली पाहिजे, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. ‘झाडाझडती’ ही कादंबरी ग्रामीण भागातील शेतक-यांची व्यथा मांडणारी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी चित्रकार नितीन सलगर यांनी पानिपतकार विश्वास पाटील यांचे रेखाचित्र काढून ते त्यांना भेट दिले. विजया  पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर अ‍ॅड. दादासाहेब देशमुख यांनी आभार मानले.