परिहवन प्रादेशिक कार्यालय दलालमुक्त करण्याच्या फतव्यामुळे आज पनवेल प्रादेशिक परविहन विभागाच्या कार्यालयात दलालांचा कारभाराला थांबविण्याची सुरुवात झाली. ज्या वाहनमालकांचे काम आहे ते नसतील तर काम होणार नाही, असा पवित्रा पनवेलचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी घेतल्यामुळे अनेक कामे रखडली, मात्र झगडे यांच्या फतव्याची अंमलबजावणी झाली. ही परिस्थिती कार्यालयात असली तरीही या कार्यालयाखाली बस्तान मांडलेल्या दलालांच्या टेबलवर वाहन चालविण्याच्या परवाना काढून देण्यासाठीचा दर दोन हजार रुपये असल्याचे दलाल ठणकावून सांगत होते.
पनवेल आरटीओ कार्यालयाचा कारभार कोटी रुपयांची उड्डाणे भरणारा आहे. गेल्या आर्थिक वर्षांत या आरटीओमध्ये ४३ हजार ८०० वाहनांची खरेदी-विक्री झाल्याची नोंद झाली. या वाहनांच्या महसुलातून २५६ कोटी ७० लाख रुपये परिवहन विभागाच्या तिजोरीत जमा झाले. एवढय़ा मोठय़ा दिमतीच्या कार्यालयाला दलालांची वाळवी लागलेली आहे. मात्र याला वाहनमालकही तेवढय़ाच प्रमाणात जबाबदार नसल्याचे येथील अधिकारी सांगतात. वेळ नसल्याने हे मालकवर्ग या कार्यालयात ठिकठिकाणी झळकवलेले फलक न पाहता थेट दलालांच्या टेबलकडे धाव घेतात. तिथपासून दलालांचा शिरकाव सुरू होतो. गुरुवारच्या आयुक्त झगडे यांच्या फतव्याचे अंमलबजावणी करताना आरटीओच्या कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाकीनऊ झाले. अनेक वर्षांची परंपरा कशी मोडणार याची सुरुवात शुक्रवारी झाली. वाहनमालक पाहिजे त्याशिवाय काम होणार नाही, अशा पद्धतीच्या जपाचा श्रीगणेशा आरटीओ कार्यालयात होत होता.

मोटार ट्रेनिंग स्कूलच्या प्रतिनिधींचे मात्र चांगभले
वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आरटीओने वेबसाइटवरून अपॉइन्टमेन्ट घेणे गरजेचे आहे. त्यानंतर परवाना मिळण्यासाठी परीक्षेची तयारी करावी लागते. ही परीक्षा संगणकीय पद्धतीने होते. अवघा अडीचशे रुपये सरकारी भरणा करून परवाना मिळविता येतो. परीक्षार्थीला संगणकावर साडेचार मिनिटांमध्ये पंधरा प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. एका प्रश्नाचे उत्तर तीस सेकंदांमध्ये संगणकावर नोंदवायचे आहे. पंधरापैकी नऊ प्रश्नांची उत्तरे तंतोतंत देणारे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात. त्यानिमित्ताने त्याला वाहतुकीचे नियम समजतात. दोन हजार रुपये दलालाला दिल्यावरही ही परीक्षा द्यावीच लागणार आहे. दलालमुक्ती प्रकरणामुळे मोटार ट्रेनिंग स्कूलच्या प्रतिनिधींचे चांगभले झाले आहे. त्यामुळे नामकरण होऊन यापुढे अधिकृत मोटार ट्रेनिंग स्कूलचे प्रतिनिधी कार्यालयांमध्ये मोठय़ा संख्येने दिसतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते.

आयुक्त अचानक भेट देणार
आयुक्त महेश झगडे यांनी दलाल मुक्तीचा निर्णय झपाटय़ाने घेतला. ते कधीही कोणत्याही आरटीओ कार्यालयाला अचानक भेट देणार असल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा मिळाला आहे. परंतु पनवेलचे आरटीओ २५६ कोटी रुपयांच्या उत्पन्नासाठी झटणाऱ्या ४५ कर्मचाऱ्यांवर वाढत्या कामाचा ताण पडला आहे. येथे अजून ४५ कर्मचाऱ्यांची गरज आहे. ही गरज तातडीने आयुक्त झगडे यांनी भागविल्यास कर्मचाऱ्यांना खासगी मदतनीसांची गरज भासणार नाही. दलाल मुक्ती करण्यापूर्वी आयुक्तांनी खासगी मदतनीस मुक्त कारभार करावा, अशी मागणी कर्मचारीवर्गातून होत आहे.